नाइट शिफ्टवाल्यांच्या झोपेचं काय? कशी काळजी घ्यायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:19 AM2022-03-24T05:19:04+5:302022-03-24T07:21:35+5:30

कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना, हॉस्पिटलमध्ये काम करणारे  डॉक्टर्स, नर्स यांना नाईट शिफ्ट किंवा रात्रपाळीत तसंच दिवसाच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. अशा बहुतांश लोकांना झोपेचा त्रास असतो. या त्रासालाच ‘शिफ्ट वर्क डिसऑर्डर’ असं म्हटलं जातं.

precautions for employees working in night shifts | नाइट शिफ्टवाल्यांच्या झोपेचं काय? कशी काळजी घ्यायची?

नाइट शिफ्टवाल्यांच्या झोपेचं काय? कशी काळजी घ्यायची?

googlenewsNext

तुमची ‘शिफ्ट ड्युटी’ असते का? म्हणजे कधी नाइट शिफ्ट, कधी सकाळची शिफ्ट, कधी दुपारची शिफ्ट... असं वेगवेगळ्या वेळी तुम्हाला काम करावं लागतं का? विशेषत: कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना, हॉस्पिटलमध्ये काम करणारे  डॉक्टर्स, नर्स यांना नाईट शिफ्ट किंवा रात्रपाळीत तसंच दिवसाच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. अशा बहुतांश लोकांना झोपेचा त्रास असतो. या त्रासालाच ‘शिफ्ट वर्क डिसऑर्डर’ असं म्हटलं जातं. कारण यातल्या अनेकांना झोप लागायला खूप वेळ लागतो, नीट झोप लागत नाही,  झोप पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही, उठल्यावरही  उत्साह वाटत नाही, पुरेशी झोप न झाल्यामुळे इतरही अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. सतर्कता कमी होते, कामाच्या किंवा इतर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढते, नैराश्य येऊ शकतं, निद्रानाश जडू शकतो, लठ्ठपणा वाढतो, हृदयविकार सुरू होतो, अपचनाच्या तक्रारी सुरू होतात.. याचं कारण जाग आणि झोप याचं जे नैसर्गिक चक्र असतं, तेच अशा शिफ्ट ड्युटीमुळे बिघडतं ..

अशावेळी काय करावं? 
१- दर आठवड्याला शिफ्ट बदलण्याऐवजी ‘मला जास्तीत जास्त काळ एकच कोणतीतरी शिफ्ट द्या’, अशी विनंती तुम्ही तुमच्या कंपनीला करू शकता. त्यामुळे तुमची जाग आणि झोप याचं चक्र त्यातल्या त्यात थोडं सुधारु शकतं.
२- शिफ्ट ड्युटी बदलणं, दीर्घ काळ एकच ड्युटी ठेवणं शक्य नसेल, तर निदान आपलं झोपेचं तंत्र तरी सांभाळा. दिवसाच्या कुठल्याही वेळी तुम्हाला झोपावं लागत असेल, तर आपल्या बेडरुममध्ये शक्यतो अंधार असेल, कोणताही व्यत्यय, आवाज, गोंगाट नसेल, याची काळजी घ्या. 
३- डोळ्यांवर येणारा प्रकाश कमी असेल, याची काळजी तुम्ही अगदी ऑफिसमधून घरी येतानाही घेऊ शकता. त्यासाठी गॉगलचा वापर करता येईल. ऑफिसमधून घरी आल्यावर शक्यतो ताबडतोब झोपायला जाण्याचा प्रयत्न करा.
४- कामावरून घरी आल्यावर गप्पा मारणं, पुन्हा काहीतरी काम करणं, गाणी, मोबाइल, टीव्ही.. या गोष्टी शक्यतो टाळा..
५- झोपेच्या वेळा बदललेल्या असल्या, तरी आपल्या जेवणाच्या वेळाही निश्चित करा. वेळी-अवेळी जेवण करणं, फास्ट फूड घेणं टाळा. पूर्ण जेवणावर भर द्या आणि झोपेपूर्वी पोटभर जेवण तर नकोच..

Web Title: precautions for employees working in night shifts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.