प्रेशर कुकर स्वयंपाकघरातला हा स्मार्ट हेल्पर ठरू शकतो जीवघेणा. प्रेशर कुकर वापरताना हे 10 नियम आवर्जून पाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 07:25 PM2017-08-01T19:25:45+5:302017-08-01T19:30:02+5:30

वेळ आणि ऊर्जा असं दोन्ही वाचवणारा प्रेशर कुकर जीवघेणासुध्दा ठरतो. शिट्टी उडणं, कुकरची वाफ चेहेर्यावर येवून भाजणं किंवा थेट कुकरचं फुटणं असे अपघात होतच असतात. प्रेशर कुकर नीट हाताळ्णं हाच हे अपघात टाळण्याचा सुरक्षित मार्ग.

Pressure cooker may cause death. For avoid accident follow 10 simple rules | प्रेशर कुकर स्वयंपाकघरातला हा स्मार्ट हेल्पर ठरू शकतो जीवघेणा. प्रेशर कुकर वापरताना हे 10 नियम आवर्जून पाळा!

प्रेशर कुकर स्वयंपाकघरातला हा स्मार्ट हेल्पर ठरू शकतो जीवघेणा. प्रेशर कुकर वापरताना हे 10 नियम आवर्जून पाळा!

googlenewsNext
ठळक मुद्दे* प्रेशर कुकर सर्वच वापरतात पण तो नियमानुसार कसा वापरावा हे प्रत्येकालाच माहित असतं असं नाही. आणि अपघात हे अशा अर्धवट ज्ञानातून किंवा अज्ञानातूनच होत असतात.* प्रेशर कुकर कधीही रस्त्यावरून किंवा चोर बाजारातून घेवू नये.* झटपट स्वयंपाक व्हावा म्हणूनच प्रेशर कुकर वापरला जातो. हे खरं. पण कुकर झाल्यानंतर तो लगेच उघडावा एवढी घाईही बरी नव्हे.



- माधुरी पेठकर


स्वयंपाकघरातला स्मार्ट हेल्पर म्हणजे आपला प्रेशर कुकर. स्वयंपाकाचं वेळखाऊ काम झटपट करण्यात या प्रेशर कुकरचा हात कोणीच धरू शकत नाही. वेळ आणि ऊर्जा असं दोन्ही वाचवणारा हाच प्रेशर कुकर जीवघेणासुध्दा ठरतो. कालच्याच एका घटनेत प्रेशर कुकरच्या स्फोटामुळे एका छोट्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला. शिट्टी उडणं, कुकरची वाफ चेहेर्यावर येवून भाजणं असे अपघातही प्रेशर कुकरनं होतच असतात. प्रेशर कुकर नीट हाताळ्णं हाच हे अपघात टाळण्याचा सुरक्षित मार्ग.

 

प्रेशर कुकर कसा हाताळाल?
1) स्वस्तात मस्त घेण्याची हौस अनेकांना असते. पण हीच हौस प्रेशर कुकरसारख्या गोष्टींच्या बाबतीत अंगाशीही येते. म्हणूनच प्रेशर कुकर कधीही रस्त्यावरून किंवा चोर बाजारातून घेवू नये. ब्रॅण्डेड कुकर, पावती आणि वॉरण्टी गॅरण्टीसह घ्यावा.
2 ) प्रेशर कुकर वापरताना कुकरच्या रबरी रिंगकडे कायम लक्ष असू द्यावं. रिंग जर ढिली झाली असेल, रिंग जर तुटलेली किंवा खराब झाली असेल तर ती लगेच बदलावी. आकार बदललेली रिंग कधीही वापरू नये.
3) प्रेशर कुकरसोबत तो कसा वापरावा यासंबंधीची माहिती पुस्तिकाही येते. प्रेशर कुकरसारखी सोपी वस्तू वापरायला कशाला हवी माहिती पुस्तिका असाही अनेकांना प्रश्न पडू शकतो. पण प्रेशर, तापमान यासंबंधीची आवश्यक आणि महत्त्वाची माहिती या पुस्तिकेत असते. प्रेशर कुकर सर्वच वापरतात पण तो नियमानुसार कसा वापरावा हे प्रत्येकालाच माहित असतं असं नाही. आणि अपघात हे अशा अर्धवट ज्ञानातून किंवा अज्ञानातूनच होत असतात.
4) आपला प्रेशर कुकर किती लिटरचा आहे आणि आपण त्यात किती शिजवू बघतो आहे याचं भान प्रत्येकवेळेस असायला हवं. प्रमाणापेक्षा जास्त घटक प्रेशर कुकरमध्ये ठेवणं घातक असतं. कारण पदार्थ वाफवताना त्याचं आकारमान वाढतं. हा विचार न करता पदार्थ लावले तर प्रेशर कुकरचा जीव कोंडू शकतो.त्याचाच परिणाम म्हणजे भस्सकन वाफ बाहेर पडून अपघात घडू शकतात.
5) झटपट स्वयंपाक व्हावा म्हणूनच प्रेशर कुकर वापरला जातो. हे खरं. पण कुकर झाल्यानंतर तो लगेच उघडावा एवढी घाईही बरी नव्हे. कुकर खालचा गॅस बंद केल्यानंतर कुकरमधली वाफ व्यवस्थित जिरू द्यावी. आणि नंतरच कुकर उघडावा. हे जेवढं सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं तितकंच पदार्थ शिजण्यासाठी आणि त्याच्या स्वादासाठीही महत्त्वाचं असतं. खूपच घाई असेल तर गरम कुकर नळाखाली धरावा. यामुळे कुकर थंड होतो.

6) प्रेशर कुकर उघडताना तो एकदम उघडू नये. शिट्टी काढून उघडावा. कुकरमध्ये असलेली वाफ त्यातून निघून जाते. तसेच कुकर उघडताना चेहरा जवळ नेवू नये. वाफ चेहेर्यावर येवू शकते.
7) प्रेशर कुकर वापरताना तो लावण्याआधी कायम त्याचं निरिक्षण करावं. त्याचा व्हॉल्व, रिंग, कुकरचा आकार हे सर्व बघूनच रोज कुकर वापरावा. यामुळे कुकर बिघडत असल्यास वेळीच लक्षात येतं. यामुळे गैरसोय आणि अपघात दोन्ही टाळता येतात.
8) प्रेशर कुकर वापरल्यानंतर तो कायम व्यवस्थित स्वच्छ करून ठेवावा. कुकरचं झाकणं, शिट्टी, रिंग हे सर्व स्वच्छ असायला हवं.
9) प्रेशर कुकरचे हॅण्डल हे ढिले असता कामा नये. अनेकजण हॅण्डल ढिले झाले तरी ते तसेच वापरतात. यामुळे गरम कुकर एका जागेवरून दुसर्या जागेवर नेताना अपघात घडू शकतात.
10) कुकरमध्ये वरण-भात लावताना खाली थोडं पाणी ठेवावं लागतं. हे पाण्याचं प्रमाण कमीही असायला नको आणि जास्तही असता कामा नये. हे प्रमाण चुकलं तर प्रेशर कुकरचा व्हॉल्व लवकर खराब होतो.

Web Title: Pressure cooker may cause death. For avoid accident follow 10 simple rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.