वयानुसार शरीराला किती प्रोटीन्सची गरज असते?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 11:50 AM2018-07-25T11:50:21+5:302018-07-25T12:01:30+5:30
शरीराचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी ज्याप्रमाणे व्हिटॅमिन आणि मिनरल्स उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे प्रोटीनसुद्धा उपयोगी असतात. प्रोटीन्सचं मुख्य कार्य स्नायू तयार करणं असतं.
शरीराचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी ज्याप्रमाणे व्हिटॅमिन आणि मिनरल्स उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे प्रोटीनसुद्धा उपयोगी असतात. प्रोटीन्सचं मुख्य कार्य स्नायू तयार करणं असतं. प्रोटीन एक असं पोषक तत्त्व आहे, ज्याला आपलं शरीर टिश्यू, हार्मोन, एंजाइम आणि अशा अनेक कामांसाठी लागणारे केमिकल तयार करण्यासाठी वापरतं. प्रोटीनचा उपयोग शरीरामध्ये अमीनो अॅसिड तयार करण्यासाठी देखील केला जातो. शरीराची आणि स्नायूंची योग्य वाढ, लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि मेटाबॉल्जिम सामान्य ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील प्रोटीनची मदत होते.
शरीरासाठी दररोज किती प्रोटीन आवश्यक?
सीडीसीच्या नुसार, अनेकवेळी असे सांगण्यात येते की, दररोज 20 ते 35 टक्के कॅलरी प्रोटीनमधून येतात. तसेच स्नायूंच्या मजबूतीसाठी प्रोटीन खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. बॉडी बिल्डिंग करणाऱ्या व्यक्ति शरीरातील स्नायू बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोटीन घेतात. परंतु एका दिवसात किती प्रोटीन घ्यायचे हे हऱ्याच जणांना माहीत नसते. याचा सल्ला फार कमी लोकं देतात. इंस्टीट्यूट ऑफ मेडिसिनमध्ये फूड आणि न्यूट्रीशन बोर्डनुसार, जर तुम्ही पुरूष आहात, तर तुम्हाला एका दिवसात 56 ग्रॅम प्रोटीन घेणं गरजेचं असतं. तेच महिलांना एका दिवसात 46 ग्रॅम प्रोटीन घेणं गरजेचं असतं.
वयानुसार शरीरासाठी आवश्यक असणारं प्रोटीनचं प्रमाण
1 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी 13 ग्रॅम प्रोटीन
4 ते 9 वर्षांच्या मुलांसाठी 19 ग्रॅम प्रोटीन
9 ते 13 वर्षांच्या मुलांसाठी दररोज 34 ग्रॅम
14 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी 46 ग्रॅम प्रोटीनची दररोज गरज असते.
19 वर्षांवरील व्यक्तिंसाठी दररोज 56 ग्रॅम प्रोटीनची गरज असते.
19 वर्षांवरील महिलांसाठी प्रतिदिन 46 ग्रॅम प्रोटीनची गरज असते.
जास्त प्रोटीन खाण्याचे नुकसान
प्रोटीन स्नायू बळकट बनवण्यासाठी मदत करतात. परंतु, जास्त प्रोटीन असलेले पदार्थ खाल्यानं तुमचं वजनही वाढतं. आहार तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, वजन घटवण्यासाठी प्रोटीन प्रभावी असले तरीदेखील, आहारात जास्त प्रमाणात प्रोटीनचा समावेश केल्यानं वजन वाढण्याचा धोकाही संभवतो.
1. सतत लघवीचा त्रास होणं
जेव्हा आपण जास्त प्रोटीन खातो. तेव्हा तुमची किडनी ते लघवीमार्फत बाहेर टाकण्यासाठी जास्त मेहनत घेते. त्यासाठी तुम्हाला सतत लघवीचा त्रास होतो आणि तहानही खुप लागते. त्यामुळे जास्त प्रोटीन डाएटसोबतच फळं, भाज्या आणि बियांचं अधिक सेवन करणं गरजेचं असतं. जेणेकरून तुम्हाला मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम मिळू शकेल. जे सतत होणाऱ्या लघवीच्या त्रासामुळे शरीराबाहेर टाकले जातात.
2. वजन वाढवणे
जास्त प्रोटीन खाल्यामुळे कॅलरीचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. जेव्हा तुम्ही अचानक चिकन, मासे आणि इतर प्रोटीनयुक्त गोष्टी खाण्यास सुरुवात करतात. तेव्हा तुमचं वजन वाढू शकतं.
3. बद्धकोष्ठता आणि अतिसाराचा धोका
जर तुम्ही फायबर असलेले पदार्थ खाणं सोडलं तर तुम्हाला बद्धकोष्ठासारखी पचनाची समस्या होऊ शकते. पुरेसे प्रोबायोटिक्स न घेण्यामुळे आणि प्रोटीन डाएट घेतल्यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे तुम्हाला डायरिया, बद्धकोष्ठता होऊ शकते.
4. चिंता आणि ताण यांचा धोका
कधी कधी प्रोटीन डाएटसाठी कार्बोहायड्रेट सोडण्याची गरज भासते. ज्यामुळे तुमच्या मूडवर परिणाम होतो. आतड्यांसंबंधी जीवाणूंमध्ये असंतुलन मानसिक स्वास्थ, चिंता यांच्याशी संबंधित आहे. यामुळे तुम्हाला फार सुस्ती येऊ शकत असून तुमच्या मूडवर परिणाम होतो. याव्यतिरिक्त कार्बोहाइड्रेट तुमच्या ब्रेनमध्ये सेरोटोनिनचे प्रमाण वाढवते. त्यामुळे तुम्ही खुश रहाता.