कॅन्सर उपचाराचे दुष्परिणाम कमी करणारी ‘प्रोटॉन थेरपी’
By संतोष आंधळे | Published: September 30, 2024 09:55 AM2024-09-30T09:55:01+5:302024-09-30T09:55:16+5:30
रेडिएशन थेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशींवर क्ष किरण सोडून नष्ट केले जातात किंवा त्याची वाढ थांबवितात. मात्र या पद्धतीत कॅन्सरच्या पेशींच्या आजूबाजूच्या चांगल्या पेशींवर सुद्धा हे क्ष किरण गेल्याने चांगल्या पेशी नष्ट होतात.
- संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी
कुटुंबातील कुठल्या सदस्याला कॅन्सर झाला हे समजल्यापासून तो रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांची पाचावर धारण बसते. या आजाराची इतकी जबरदस्त दहशत आहे की अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. कारण त्यावर होणारे उपचार आणि त्यांच्या नंतर होणारे दुष्परिणाम याची भीती अनेकांच्या मनात घर करून बसलेली असते. मात्र गेल्या काही वर्षांत वैद्यकीय विश्वात मोठी प्रगती झाली असल्यामुळे वैद्यकीय उपचार सुकर करण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश प्राप्त झाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे कॅन्सरच्या उपचारात वापरात येणारी प्रोटॉन थेरपी. रेडिएशन थेरपी ऐवजी प्रोटॉन थेरपीचा वापर केल्याने दुष्परिणाम कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
टाटा रुग्णालयात ही थेरपी सुरू करून वर्ष झाले. अनेकांना या थेरपीचा फायदा झाला. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत केवळ खारघर येथील ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ॲक्टरेक) या ठिकाणी या थेरपीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच चेन्नई येथील खासगी रुग्णालयात ही थेरपी उपलब्ध असून मोठा खर्च यासाठी त्या ठिकाणी येतो. कॅन्सरच्या उपचारपद्धतीत किमो आणि रेडिएशन उपचारपद्धतीचा वापर करण्यात येतो. यामध्ये रेडिएशन पद्धतीमधीलच पुढचे पाऊल म्हणजे ‘प्रोटॉन थेरपी’ असे म्हणता येईल.
रेडिएशन आणि प्रोटॉन थेरपीत फरक काय?
रेडिएशन थेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशींवर क्ष किरण सोडून नष्ट केले जातात किंवा त्याची वाढ थांबवितात. मात्र या पद्धतीत कॅन्सरच्या पेशींच्या आजूबाजूच्या चांगल्या पेशींवर सुद्धा हे क्ष किरण गेल्याने चांगल्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे काही प्रमाणात या थेरपीमध्ये दुष्परिणाम दिसून येतात. प्रोटॉन ही यातीलच एक नव्याने विकसित झालेली उपचार पद्धती आहे. ही थेरपी देण्यासाठी सायक्लोट्रॉन यंत्राचा वापर करण्यात येतो. यामध्ये क्ष किरणाऐवजी प्रोटॉनचा वापर केला जातो. कॅन्सरच्या पेशी ज्या ठिकाणी आहे त्याला टार्गेट करून त्या ठिकाणच्या कॅन्सरचे पेशी नष्ट केल्या जातात. ज्या ठिकाणी ट्युमर आहे, त्या ठिकाणीच या प्रोटॉनचा वापर केला जातो. त्यामुळे आजूबाजूच्या कोणत्याही चांगल्या पेशींवर फरक होत नाही. त्यामुळे साहजिकच दुष्मपरिणाम कमी होतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आलेल्या या थेरपीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ॲक्टरेक येथे वर्षभरात ११९ रुग्णांनी या थेरपीचा उपचार घेतला असून, त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहे.
गरीब रुग्णांना मोफत दिली थेरपी
११९ पैकी २४ टक्के रुग्णांना ही थेरपी पूर्णपणे मोफत रुग्ण कल्याण निधीमधून देण्यात आली. काही रुग्ण हे सामान्य श्रेणीतील होते तर काही रुग्ण हे खासगी श्रेणीतील होते. ज्या रुग्णांमध्ये उपचार केले त्यामध्ये, प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, हाडाचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर, लहान मुलाचा ट्युमरचा कॅन्सर, या सर्व रुग्णांना या थेरपीचे उपचार देण्यात आले. त्या सर्व रुग्णांच्या उपचाराचा आढावा घेण्यात आला आहे. प्रोटॉन थेरपीचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ लष्कर असून, अधिक रुग्णांना याचा फायदा कसा करून देता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
प्रचंड महागडी थेरपी
या थेरपीसाठी परदेशात एक ते दीड कोटी खर्च येतो, तर सामान्य श्रेणीतील रुग्णांसाठी पाच लाख आणि खासगी श्रेणीतील रुग्णांसाठी पंधरा लाख रुपये खर्च येतो. तर परदेशातील रुग्णांसाठी २५ लाख रुपये खर्च येतो. आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी सीएसआरच्या माध्यमातून या रुग्णांसाठी मोफत थेरपी देण्यात येत आहे.