१८ ते २५ वयोगटातील तरुणांना मोफत कंडोम देणार; संसर्ग कमी करण्यासाठी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 06:00 AM2022-12-11T06:00:58+5:302022-12-11T06:01:19+5:30
वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्सने २६ वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत केले होते.
पॅरिस : १८ ते २५ वयोगटातील तरुणांना जानेवारी महिन्यापासून मोफत कंडोम देण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे. ‘नको असलेली गर्भधारणा’ आणि तरुणांमध्ये ‘लैंगिक संक्रमित संसर्ग’चा प्रसार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याबाबतची घोषणा केली. सर्व फार्मसीमध्ये, १ जानेवारीपासून १८ ते २५ वयोगटातील लोकांसाठी कंडोम मोफत असतील. फ्रान्ससमोर लैंगिक शिक्षणाविषयी आव्हान आहे, आपण या विषयात चांगले नाही. हा निर्णय म्हणजे प्रतिबंधातील एक छोटी क्रांती असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
फ्रान्समधील तरुणांमध्ये लैंगिक आजार वाढू लागले आहेत. २५ वर्षांपर्यंतचे नागरिक मोठ्या संख्येने लैंगिक आजारांनी ग्रस्त आहेत. लैंगिक संक्रमित संसर्गाचा दर ३० टक्के वाढल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
आधी महिलांसाठी घेतला हाेता निर्णय
या वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्सने २६ वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत केले होते. त्यापूर्वी गर्भनिरोधक १८ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या महिला आणि मुलींसाठी मोफत होते. आता १८ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी कंडोम मोफत दिले जातील.