सिगारेटचे व्यसन सोडायचे? मग घाला ‘नेकलेस’; कसे काम करते? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:48 AM2023-02-24T10:48:23+5:302023-02-24T10:48:52+5:30
अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीत व्यसन सोडवण्यास मदत करणारे संशोधन
न्यूयॉर्क : सिगारेटसारखे व्यसन सोडण्याची अनेकांना इच्छा असते, परंतु ते त्यांना शक्य होत नाही. अनेक जण तर कित्येक महिने यशस्वीरीत्या सिगारेट किंवा कोणतेही व्यसन सोडतात, परंतु कालांतराने पुन्हा सुरू करतात. त्यांचा निग्रह कोठे तरी कमी पडतो. सिगारेटचे व्यसन सोडविण्यासाठी आता अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शोधलेला ‘स्मार्ट नेकलेस’ (स्मोकमॉन) मदत करू शकतो.
खरे तर हे गळ्यात घालण्याचे एक उपकरण आहे, ज्यामध्ये निळ्या रंगाचे पेंडंट (लटकन) असते आणि ते घालणारा व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त सिगारेट किंवा इतर गोष्टी घेत असेल तर हे उपकरण तसा इशारा देते. त्यातील पेंडंट सर्वसाधारण परिस्थितीत हलका निळा प्रकाश ते हलका हिरवा प्रकाश सोडते आणि अधिक सिगारेट ओढल्यानंतर ते लालसर निळा प्रकाश सोडते. हे संशोधन १३ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाल्यानंतर त्याबाबत जगभरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुरक्षित ‘स्मोकमॉन’
या उपकरणाचे नाव ‘स्मोकमॉन’ आहे. ते धूम्रपान करणाऱ्याच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेते आणि केवळ उष्णतेचा मागोवा घेते दृश्यांचा नाही. यामुळेच हे उपकरण लोकांना परिधान करण्यास सोयीस्कर आणि सुरक्षित बनवते.
किती हानिकारक?
सिगारेटमध्ये अतिशय हानिकारक रसायने असतात, जी अनेक आजारांना कारणीभूत ठरतात. जगात धूम्रपानाने दरवर्षी ८० लाखांहून अधिक लोकांचा जीव जातो. एकट्या अमेरिकेत दरवर्षी ५ लाखांहून अधिक मृत्यू होतात.
‘स्मोकिंग टोपोग्राफी’चा वापर
एखादी व्यक्ती सिगारेटचा झुरका घेते आणि फुप्फुसांत ठेवते तो वेळ तसेच तोंडात सिगारेट किती वेळ ठेवता, या सर्व मोजमापाला स्मोकिंग टोपोग्राफी म्हणतात. ‘स्मोकमॉन’मध्ये या तंत्राचा आधार घेण्यात आला आहे. सेन्सरच्या मदतीने पेंडंट हा सर्व डेटा मिळवून तो साठवून त्याप्रमाणे इशारा देतो.
कसे काम करते?
गळ्यात घातलेले हे पेंडंट प्रत्यक्षात सिगारेट ओढल्याने निर्माण होणारी उष्णतेची नोंद घेते. त्यानंतर ते किती सिगारेट ओढल्या जात आहेत व कोणत्या अंतराने ओढल्या जाते हे सांगते. हे उपकरण सिगारेट सोडलेल्या लोकांना पुन्हा सिगारेट पिणे बंद करण्यास मदत करते.