पावसाळा म्हणजे त्वचारोगांना निमंत्रण, वेळीच करा उपाय अन् टाळा गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:44 PM2021-07-19T16:44:35+5:302021-07-19T16:45:32+5:30
पावसाळी वातावरणात धुळ, ओलसरपणा आणि जीवाणूंचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमच्या त्वचेला लगेच अॅलर्जी होते. मात्र ही अॅलर्जी तुम्ही सामान्य घरगुती उपायांनी दूर करू शकता. कशी? घ्या जाणून...
पावसाळा म्हटलं म्हणजे आजार आलेच. त्यात त्वचेच्या समस्या सामान्यच. पावसाळी वातावरणात धुळ, ओलसरपणा आणि जीवाणूंचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमच्या त्वचेला लगेच अॅलर्जी होते. मात्र ही अॅलर्जी तुम्ही सामान्य घरगुती उपायांनी दूर करू शकता. कशी? घ्या जाणून...
कोरफड
कोरफडीमधील औषधी गुणधर्मांच्या व्याप्तीबद्दल आपण सारेच जाणून आहोत. कोरफडीचा वापर अनेक गोष्टींत व अनेक प्रकारे केला जातो. कोरफडीचा ज्यूस देखील लोक तितक्याच प्रमाणात वापरतात. पावसाळ्यात स्किन अॅलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड एक रामबाम उपाय आहे. जर तुम्हाला अॅलर्जीमुळे शरीरावर खाज व त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत असेल तर कोरफडीचा गर खाज व जळजळ अगदी सहज व झटपट रोखेल.
कसा करावा वापर?
खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम कोरफड घेऊन त्वचेवर लावा. जर तुमच्याकडे कोरफडीचे झाड नसेल तर तुम्ही बाजारातून विकत आणून किंवा अॅलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. ३० ते ४० मिनिटे कोरफडीचा गर अॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावून ठेवा. काहीच दिवसांत खाज व जळजळीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.
खोबरेल तेल
खोबरेल तेल स्किन केयरसाठी सर्वात उत्तम तेल आहे. यामध्ये मॉइस्चराइजिंग गुणधर्म असतात जे पावसामुळे अॅलर्जी झालेल्या काळात त्वचेची रक्षा करतात. इतकंच नाही तर नारळ तेल अॅलर्जीमुळे होणारी खाज देखील थांबवतं.
कसा करावा वापर?
एका वाटीत थोडं खोबरेल तेल घ्या आणि ५ सेकंदासाठी ते गरम करा. हे कोमट तेल त्याजागी लावा जिथे तुम्हाला अॅलर्जी झाली आहे. लक्षात ठेवा, तेल अॅलर्जी झालेल्या ठिकाणी फक्त लावा चुकूनही मालिश करू नका. १ तास तेल तसंच राहू द्या. या तेलाचा वापर तुम्ही ३ ते ४ तासांनी पुन्हा करू शकता.
अॅप्पल सायडर व्हिनेगर
अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर लोक सामान्यत: वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रियेसंबंधित त्रास दूर करण्यासाठी केला जातो. पण हे फक्त वजन कमी करणं किंवा डायजेशन ठीक करण्यासाठीच नाही तर उत्तम स्किन केयर एजंटही आहे. यामध्ये अॅसिटीक अॅसिड असतं, जे पावसाळ्यामुळे त्वचेवर आलेली खाज व अॅलर्जी कमी करतं. पण नाजूक त्वचेवर याचा वापर करू नये.
कसा करावा वापर?
एक कप गरम पाण्यात एक टिस्पून अॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळा. आता कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण अॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावा. आता हे सुकण्यासाठी ठेवा आणि काही वेळानंतर थंड पाण्याने जागा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून कमीत कमी २ वेळा करू शकता.
बेकिंग सोडा
स्किन अॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ आहे जो अनेक समस्यांवर लाभदायक ठरतो. पण बेकिंग सोडा वापरताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असते. बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो.
कसा करावा वापर?
त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा. आता याची पातळ व मऊ अशी पेस्ट बनवून अॅलर्जी झालेल्या जागेवर लावा. १० मिनिटांनंतर ही पेस्ट धुवा. अॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.
लिंबाचा रस
लिंबू जसे आरोग्यासाठी उपयुक्त असते तसा लिंबाचा रस त्वचेसाठीही उपयुक्त असतो. यातील व्हिटॅमिन सी त्वचा उजळ आणि सुंदर बनवतो. पावसाळ्यात होणाऱ्या स्कीन अॅलर्जीवरही लिंबू फायदेशीर आहे. लिंबात अँटी सॅप्टिक आणि अँटी इफ्लेमेंटरी गुण असतात जे पावसाळ्यात होणाऱ्या अॅलर्जीला बरे करतात. लिंबाच्या वापराने खाजेची समस्याही दूर होते.
कसा करावा वापर?
लिंबाचा रस काढा. ज्या ठिकाणी अॅलर्जी झाली आहे त्या ठिकाणी लावा. १०-१५ मिनिटं तसाच ठेऊन द्या. त्यानंतर पाण्याने धुवुन टाका.