पावसाळा म्हणजे आजारांना निमंत्रण, पण 'हे' पदार्थ करतील रामबाण इलाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:22 PM2021-06-28T21:22:46+5:302021-06-28T21:43:47+5:30
पावसाळ्यात स्वत:च्या आरोग्याची निगा तुम्ही राखलीच पाहिजे. त्यामुळे पावसाळा आल्यावर न घाबरता तुमच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत?
पावसाळा म्हणजे आजारांना निमंत्रण हे समीकरण ठरलेलेच. पावसाळा सुरु झाला की सर्दी, पडसं, ताप तर सर्वसामान्यच आहे. पण त्याचबरोबर अनेक साथीचे आजाराही त्यासोबत येतात. पावसाळ्यात स्वत:च्या आरोग्याची निगा तुम्ही राखलीच पाहिजे. त्यामुळे पावसाळा आल्यावर न घाबरता तुमच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत?
भरपूर खा पावसाळ्यात मिळणारी फळे
मान्सूनचा ऋतू येताच चारीबाजूंना हिरवेगार वातावरण दिसते. तसेच अनेक पावसाळी फळांनी बाजारपेठा भरून जातात. जर आपल्याला या ऋतूत आपली त्वचा तजेलदार ठेवायची असेल आणि निरोगी राहायचे असेल तर या पावसाळ्यात मिळणाऱ्या फळांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करा. लिची, पेर, जांभळे ही फळे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात आढळतात आणि या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेतली पाण्याची पातळी योग्य राखली जाते आणि कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
भरपूर पाणी प्यायला विसरू नका
अनेक लोक पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात पितात. जर आपणही असे करत असाल तर ही सवय लगेच बदला. पाण्यामुळे शरीरातील ओलावा कायम राहतो ज्यामुळे आपली त्वचा कोरडी दिसत नाही. जर आपण वेळोवेळी पाणी पीत राहिलात तर त्वचा स्वच्छ राहते आणि पाणी सामान्य आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
मध
आपल्या डाएटमध्ये मधाचा समावेश करा. मध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे आपण अॅलर्जीशी दोन हात करू शकतो.
तुळस
पावसाळ्याची स्वतःची अशी एक मजा असते. मात्र या ऋतूत तुळशीची पाने आवर्जून खाण्याची सवय करून घ्या. तुळशीच्या पानांमधील अँटीऑक्सिडंट्स आपल्याला अनेक रोग आणि आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात.
दही
दह्यात प्रोबायोटिक गुणधर्म असतात. त्यातील बॅक्टेरिया आतड्यांसाठी फायदेशीर असतात.