रत्नागिरीचा आरोग्य विभाग इमारतींसाठी जागेच्या शोधात
By admin | Published: July 8, 2017 06:07 PM2017-07-08T18:07:55+5:302017-07-08T18:11:55+5:30
जिल्ह्यात १६७ उपकेंद्रांसाठी जमिनीचा शोध सुरु, अद्याप व्यवस्था नाही
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. ८ : जिल्ह्यातील १६७ आरोग्य उपकेंद्र इमारतींसाठी जागेच्या शोधात आहेत. प्रयत्न करूनही इमारतींसाठी जमीन मिळत नसल्याने ही उपकेंद्र नजीकच्या अन्य ठिकाणी उभारावीत, असा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मागील वर्षी घेऊन संबंधित ग्रामपंचायतींना नोटीसही बजावली. मात्र, तेथेही अद्याप जमिनीची व्यवस्था झालेली नाही़
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ३७६ आरोग्य उपकेंद्र मंजूर आहेत. यापैकी २०९ उपकेंद्रांना इमारती आहेत, तर १६७ उपकेंद्रांना इमारतींसाठी अजूनही जमीन मिळालेली नाही. उपकेंद्र इमारत बांधण्यासाठी लागणारी जमीन खरेदीकरिता शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यासाठी जमीन विनामोबदला मिळाली आणि जागेचे बक्षीसपत्र केल्यानंतरच त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारता येते. आता जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या उपकेंद्रांना जमीन देण्यास कोणीही पुढे येत नाही.
जमीन नसल्याने उपकेंद्र बांधता आले नसल्यास तेथून ते उपकेंद्र जवळच्या गावामध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात हलवण्यात यावे, अशी सूचना शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभागाला देण्यात आली होती. त्यासाठी आरोग्य उपसंचालक आणि संचालक यांच्याकडून शासनाला प्रस्ताव सादर करावा. संबंधित गावाची लोकसंख्या, तेथील परिस्थिती, रस्ते, पाणी, वीज आदिंची पाहणी करावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आली होती.
जिल्ह्यातील १६७ उपकेंद्रांना जमिनीची आवश्यकता असल्याने त्यांना जमीन मिळावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने वेळोवेळी आवाहन केले होते. मात्र, ही बाब तेथील स्थानिकांनी गांभीर्याने घेतलेली नाही, असे स्पष्ट होते.