सारांश लेख: तरुणांनो आत्महत्या काय करता, हे वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:58 AM2022-01-23T11:58:39+5:302022-01-23T11:59:36+5:30
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याआधी आत्महत्येला पर्याय नाहीच का प्रश्न पडला की मग खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्यात मार्ग सापडायला सुरुवात होते.
डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ
ज आपल्या आजूबाजूला अनेक जण कपाळावरती आट्या पाडलेल्या, थकलेल्या चेहऱ्याने दिसतात. ताण नाही अशी व्यक्ती सापडणे विरळच. सध्या नैराश्य वाढले असून लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत अनेक जण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. तरुणांमध्ये नैराश्य अधिक आहे. त्यांना आईवडिलांसारखा आयुष्याशी झगडण्याचा अनुभव कमी असतो. त्यामुळे संकटाशी दोन हात कसे करावेत याचे तितके कसब नसते. ते अनेक स्वप्ने एकाचवेळी पाहात असतात. या स्वप्नांच्या जोरावर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळत जातील असे त्यांना वाटते. एखादे ध्येय गाठण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्यानंतरही न मिळालेले यश याचा अनेकांना धक्का बसतो. यातूनच मानसिक तणाव वाढीला लागतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात ताण आहे. हा ताण रबर बॅण्डसारखा असावा. रबरबॅण्ड अधिक जोराने ताणला तर तुटतो. आयुष्याचेही तसेच आहे. आपल्याला किती प्रमाणात ताण सहन होतो तेवढाच घ्यावा. जर एखादी गोष्ट आपल्या क्षमतेबाहेरची आहे, अनेक वेळा प्रयत्न करूनही ती गोष्ट मिळत नाही, म्हणजे ती आपली नाही हे एका टप्प्यावर लक्षात यायला हवे. आणि जर ते लक्षात आले नाही तर मनाचा ताबा सुटतो आणि आयुष्याचे दोर कापेपर्यंत आपली मजल जाते. त्यामुळे किती ताण घेऊ शकतो, आपली क्षमता किती आहे, हे आपल्याला शक्य आहे का याचा अंदाज घेऊन काम केले की ताण नावाची गोष्ट आपल्या जवळपासही फिरकत नाही.
कोणतीही गोष्ट करताना ताण हा येताेच. त्यामुळे काहीही करताना ते माझ्यासाठी किती महत्वाचे आहे, मला आतापर्यंत किती मार्क मिळत आले आहेत, माझा मेंदू कोणत्या पातळीपर्यंत एखादी गोष्ट सहन करू शकतो हे प्रत्येकाला माहिती असते. त्यामुळे मेंदूला सहन होईल तितकेच, आवाक्यात येणारी स्वप्न पाहिली मानसिक ताण दूर होत नवीन काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते.
समाजाने उपेक्षा केल्याने अनेक जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक संस्था, शाळा यांनी पुढे येत तरुणांशी संवाद साधायला हवा. आत्महत्या हे हिमनगाचे टोक आहे. हे शेवटचे टोक येऊच नये यासाठी प्रयत्न करायला हवेत.
काय करावे
ताण रबरबॅण्ड सारखा खूप खेचू नका
आपण किती ताण सहन करू शकतो हे सतत अभ्यासा
ताण इतका का घ्या आपल्याला काम करता यायला हवे
ताण इतकाही घेऊ नये की आपले आयुष्य जळमटून जाईल
प्रत्यक्षात पूर्ण करता येऊ शकतील अशीच स्वप्ने पहा.
आजूबाजूच्या लोकांनी काय करावे
- तरुणांशी कुटुंबातील सदस्यांनी संवाद वाढवावा
- अगदी मनमोकळेपणाने बोलावे
- ताण आलेल्या व्यक्तींशी चर्चा करावी
- आत्महत्या हे हिमनगाचे टोक असते, त्यापूर्वीच अशी परिस्थिती येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत.
- आयुष्य परिकथेसारखे नाही, हे समजून सांगावे
- सामाजिक संस्थानी पुढे येउन उपक्रम राबवावेत
- थोडे झिजा, मग आनंद घ्या
प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, थोडे झिजावे लागते आणि मग कष्टातून उभे राहिलेले एखादे स्वप्न पूर्ण झालेले पाहिले की आपल्याला आकाश ठेंगणे होते. ही मजा काहीही कष्ट न करता मिळालेल्या गोष्टीत नाही.