वाचताय?-मग तुमचा मेंदू बदलतोय..
By Admin | Published: June 2, 2017 03:31 PM2017-06-02T15:31:38+5:302017-06-02T15:31:38+5:30
भारतात झालेला एक अभ्यास म्हणतो की, वाचनानं मेंदूत बदल घडताना दिसतात..
- निशांत महाजन
वयाच्या तिशीतल्या काही बायका. अशिक्षित. वयाची तिशी उलटून गेली तरी त्यांनी शाळेचं तोंड पाहिलं नाही की अक्षरओळख नाही. पण सहा महिन्याच्या शिक्षणानं त्यांना अक्षरओळख झाली, वाचता येवू लागलं. त्या शिक्षणाचा आनंद तर होताच पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या मेंदूतही काही बदल दिसले. शिक्षण अवघड होतं पण वाचल्यानं मेंदूच्या आतल्या भागात बदल झाले. ब्रेनस्टेम आणि थॅलॅमस या केंद्रात बदल झालेले अभ्यासकांना दिसून आले.
हा प्रयोग भारतातच झाला. हिंदी भाषक महिला, त्यांना नवी लिपी शिकणं, इंग्रजी वाचणं अवघड जात होतंच. मात्र त्या वाचनानं वेग घेतला तसा त्यांच्या मेंदूत बदल दिसल्याचे मॅक्स प्लॅक इन्स्टिट्यूट फॉर सायकोलिंग्विस्टिकच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या अभ्यासकांनी असं नमूद केलं आहे की, वाचनाची प्रक्रिया सातत्यानं सुरु झाल्यावर प्रौढ वयातही मेंदूतली ही केंद्र अॅक्टिव्हेट होतात. आपली रचना बदलून अधिक सक्रिय होतात. ही केंद्र कार्यरत झाल्यानं वाचनकौशल्यांत वेगानं सुधारणा होत असल्याचंही लक्षात आलं.
वाचनाचं, दुसरी भाषा शिकून, त्यातलं लेखन वाचल्यानं मेंदूत प्रौढ वयातही बदल होतात असं हा अभ्यास सांगतो.