पोटाचा घेर वाढणार नाही तर काय?..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:30 PM2017-09-12T15:30:12+5:302017-09-12T15:30:12+5:30
‘बसल्या जागी’ सारं काही हवं असेल, तर दुसरं काय मिळणार?
- मयूर पठाडे
कशी काय तुमची तब्येत?.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..
आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. कारण हा लठ्ठपणा एका दिवसात कधीच वाढत नसतो आणि कालच्यापेक्षा आज मी अमूक इतका जाड झालो, असं लगेच दाखवताही येत नाही. कारण ही प्रक्रिया हळूहळू पण निश्चितपणे होत असते.. ती प्रक्रिया समजून घेतली तर अनेकांची लठ्ठपणाची समस्या दूर होऊ शकेल..
कसा वाढत जातो आपला घेर?..
१- आॅफिस असो कि घर.. आपण किती वेळ ‘बसून’ असतो, याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. भले तुम्ही काम करीत असाल, पण ते बैठं असेल, तर पोटावरच्या सुरकुत्या निश्चितपणे वाढत जाणार.
२- आपल्या घरात आणि फावल्या वेळी, बाहेर, आॅफिसात वेफर्सची पाकिटं, शितपेयं, सोड्याच्या बाटल्या किती वेळा आपल्या हातात? त्यांचा आकार तुमच्या लक्षात येतोय? नीट पाहिलं तर ही पाकिटं दिवसेंदिवस फुगत जातानाच तुम्हाला दिसतील. ही पाकिटं त्यांच्याबरोबर आपल्यालाही फुगवतात.
३- आज करू, उद्या करू, म्हणून व्यायामाला किती वेळा तुम्ही पुढे ढकलंलय? किती वेळा, किती दिवस सलगपणे व्यायाम केलाय? करताय? अगदी व्यायाम जरी केला नाही, तरी किती गोष्टी तुम्हाला ‘बसल्या जागी’ मिळताहेत? त्यासाठी किमान चालायचे तरी कष्ट आपण घेतोय का?
४- तुमचा बीएमआय कधी मोजलाय? म्हणजे तुमचा बॉडी मास इंडेक्स? आपलं वजन, वय आणि उंची यानुसार आपला बीएमआय ठरतो. तो जर २५ ते ३०च्या दरम्यान असेल, तर तुम्ही लठ्ठ आहात आणि ३०च्या पुढे गेला असेल तर अतिलठ्ठ! त्यावर तरी विश्वास ठेवाल की नाही?
५- कोणतीही गोष्ट एकदम होत नाही. तुम्ही जसं हळूहळू लठ्ठ झालात, तसंच हळूहळूच बारीक होऊ शकाल. पोटाचा घेर कमी करू शकाल. त्यासाठी आहे तुमची तयारी?.. हळूहळूच, पण सुरुवात तरी नक्की करावी लागेल.
कराल आजपासून?.. कारण ‘उद्या’ कधीच येत नाही..