पाळी वेळेवर येत नसेल तर 'ही' असू शकतात कारणं, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:21 PM2020-01-08T17:21:43+5:302020-01-08T17:25:43+5:30
मासिकपाळी ही महिलांना महिन्यातून एकदा येते असं जरी असलं तरी याबाबतीत अनेक समस्यांचा सामना दर महिन्याला महिलांना करावा लागतो.
मासिकपाळी ही महिलांना महिन्यातून एकदा येते असं जरी असलं तरी याबाबतीत अनेक समस्यांचा सामना दर महिन्याला महिलांना करावा लागतो. पाळीची जी तारीख असते त्यावेळीच पाळी येते असं नाही. अनेकदा महिलांना पाळी येण्यासाठी उशीर होतो. साधारणपणे तारखेच्या ५ दिवसांपासून १० दिवसांपर्यंत कधीही कोणत्याही तारखेला पाळी येते. अशा खूप कमी महिला आहेत ज्यांची मासिक पाळी वेळेवर येते. शरीरात झालेल्या हर्मोनल बदलामुळे गर्भाशयाच्या आतल्या भागातून रक्तस्त्राव होत असतो. पण ज्यावेळी तुम्हाला मासिक पाळी उशीरा येते. त्यावेळी ही गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मोठे आजार सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया पाळी उशीरा आल्यास काय आहेत कारणं.
मुलींना ११ ते १२ वर्ष वयात पाळी यायला सुरूवात होते. तसंत ४५ ते ५५ वयात पाळी येणं बंद होतं. त्यानंतर स्त्रिया मुलं जन्माला घालण्यासाठी सक्षम नसतात. २८ दिवसांनी मासिक पाळीची सायकल रिपिट होत असते. काही मुलींना ११ ते १२ वर्षाचे असतानाच मासिक पाळी यायला सुरूवात होते. कदचित पाळी लवकर आल्यामुळे अनियममित होण्याची शक्यता असते. त्यासाठी वेळच्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणं गरजेचं आहे.
तुमचं वजन वाढल्यामुळे किंवा स्थुलता आल्यामुळे मासिक पाळी अनियमित येते. अनेकदा मासिक पाळी अनियमीतपणे येण्याचं कारण थायरॉइड सुध्दा असू शकतं थायरॉईड ग्रंथीमध्ये संतुलन बिघडल्यामुळे तुम्हाला समस्या उद्भवू शकते. त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
मासिक पाळी उशीरा येण्यामागे आपली खाण्यापिण्याची पद्धत आणि झोपेच्या वेळा हे दोन घटक सुध्दा कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे जर तुम्हाला पाळी येण्यास उशीर होत असेल तर खाण्यापिण्यात आणि आहार घेण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा. जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपचार करायचे असतील डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण बदल करू शकतो.
गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे सुध्दा ही समस्या उद्भवते. मासिक पाळी उशीरा येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम हा आजार आहे. अशा परिस्थितीत स्वतःउपाय करून वेळ घालवण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास समस्येवर उपचार करता येईल. त्यामुळे मासिकपाळी अनियमीत येणं थांबू शकतं.