Recipes : उन्हाळ्यासाठी खास कोकम पॅराडइझ ते मँगो स्मूदी पर्यंत जाणून घ्या संपूर्ण रेसिपी !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2017 10:24 AM2017-04-05T10:24:46+5:302017-04-05T15:56:20+5:30
उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ख़ास रेसिपी...
Next
सध्या उन्हाळ्याचा दाह सर्वांनाच जाणवायला लागला असून काही आजारही डोके वर काढू लागले आहेत. या आजारांचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून या दिवसात विशेष काळजी घ्यायला हवी. त्यासाठी थंड पाणी पिण्याबरोबर शरीराला थंडावा देणाऱ्या या पदार्थांचे सेवन करणे चांगले.
आज आम्ही आपणास काही रेसिपी सांगणार आहोत, ज्याने आपला उन्हाळा सुसह्य होईल.
* कोकम पॅराडइझ
साहित्य:
कोकम सिरप १/४ ग्लास
वॅनिला आइसक्रीम २ स्कूप
नारळ पाणी १ ग्लास
बर्फ ३-४ खडे सर्व्ह करताना
कसे तयार कराल?
बर्फाखेरीज बाकी सर्व मिक्सरमधून नीट मिक्स करून घ्या.
ग्लासामध्ये बर्फ घालून त्यावर ओतून वर आइसक्रीम घालून सर्व्ह करा.
टीप : कोकम पॅराडाइझ बनवून लगेच सर्व्ह करा. आधी बनवून ठेवू नका.
* मँगो पॅनाकोटा
साहित्य :
हापूस आंबा पल्प दीड कप
फ्रेश क्रीम सव्वा कप
फुल क्रीम दूध १ कप
जिलेटीन एक ते दीड चमचा
पाणी अर्धा कप (जिलेटीन भिजवण्यासाठी)
साखर अर्धा कप अथवा चवीनुसार
व्हॅनिला एसेन्स अर्धा चमचा
* कसे तयार कराल?
प्रथम जिलेटीन पाण्यात भिजत ठेवून गरम करून विरघळवून घ्या.
क्रीम, दूध आणि साखर एका पॅनमध्ये एकत्र करून गॅसवर ठेवून नीट हलवत त्याला एक उकळी आणा.
गॅस बंद करून त्यामध्ये गरम असताना जिलेटीन घालून तारेच्या व्हिस्कने नीट मिक्स करा.
त्यानंतर थोडा वेळ थांबून मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये मँगो पल्प आणि व्हॅनिला एसेन्स घाला व व्हिस्कने नीट मिसळा.
एकाबाऊलमध्ये ओतून फ्रीजमध्ये ४ ते ५ तास थंड करावे. सर्व्ह करताना त्यावर कापलेले आंब्याचे तुकडे आणि पुदिन्याच्या पानांनी गार्निश करावे.
टीप : क्रीम मिक्चरमध्ये जिलेटीन मिसळताना ते नीट गरम असल्याची खात्री करून घ्या. कोमट अथवा थंड असल्यास मंद आचेवर गरम करून घ्या.
* किनोवा (राजगिरा) सॅलाड
साहित्य :
राजगिरा अर्धा कप
लेट्यूस (सॅलाड लीव्ह्ज) १ मोठा बंच बारीक चिरलेला
काकडी १ कप (१/४ इंचाचे क्यूब)
टोमॅटो १ मध्यम चौकोनी कापलेला
संत्र १ सोलून तुकडे करा
फेटा चीज १/४ कप
पाणी १ कप
व्हिनेगर १ टेबल स्पून
लिंबाचा रस २ टेबल स्पून
आॅलिव्ह आॅइल २ टेबल स्पून
साखर अर्धा टेबल स्पून
मीठ अर्धा टी स्पून
काळी मिरी पावडर १/४ चमचा
राई पावडर १/४ टेबल स्पून
आल्याचा रस एक टी स्पून
* कसे तयार कराल?
सर्व साहित्य नीट एकत्र करा. साखर पूर्ण विरघळली आहे याची खात्री करून घ्या.
एका पसरट भांड्यात पाण्यामध्ये राजगिरा घालून उकळी आणून मंद आचेवर पाणी आटेपर्यंत शिजवा. (साधारण १०-१२ मिनिटे लागतील) सॅलड बाऊलमध्ये सॅलडच्या पानांचा थर लावून त्यावर अर्धा राजगिरा पसरा. काकडी, टोमॅटो अणि संत्र पसरून त्यावर ड्रेसिंग पसरा. बाजूला ठेवलेले अर्धे राजगिरा वर पसरा आणि शेवटी फेटा चीज पसरून सर्व्ह करा.
* कैरी कोकोनट स्मूदी
साहित्य :
उकडलेला कैरीचा गर १ वाटी
गूळ १ वाटी (बारीक चिरलेला)
साखर अर्धी वाटी
वेलची पावडर अर्धा चमचा
नारळाचे दूध २ वाट्या घट्ट आणि १ वाटी पातळ
काळी मिरी पावडर चिमुटभर
बर्फ थंड सर्व्ह करण्यासाठी
कसे तयार कराल?
कैरीचा गर, गूळ, साखर आणि वेलची पावडर एकत्र करून मिक्सरमध्ये मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.
वरील अर्धा कप तयार गर घेऊन त्यात नारळाचे दूध आणि मिरीपूड घालून मिक्सरमधून काढा.
ग्लासमध्ये ओतून बर्फ घालून वर थोडासा कैरीचा गर घालून गार्निश करून सर्व्ह करा.
* काकडी कूलर
साहित्य:
काकडी २ कप सोलून बारीक तुकडे केलेली
पुदिन्याची पाने सात-आठ
पाणी २ कप
लिंबाचा रस अर्धा टेबल स्पून
साखर २ टी स्पून किंवा चवीप्रमाणे
मीठ १/४ टी स्पून किंवा चवीप्रमाणे
काळी मिरी पावडर १/४ टी स्पून किंवा चवीप्रमाणे
बर्फाचे तुकडे सर्व्ह करताना.
कसे तयार कराल?
लिंबाचा रस सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून नीट बारीक करून घ्या. गाळणीतून गाळून फक्त रस वेगळा काढा. वरील रसात लिंबाचा रस घालून ग्लासमध्ये बफार्चे तुकडे घालून सर्व्ह करा.
* मँगो स्मूदी
साहित्य :
आंबे २ कप तुकडे केलेले
केळी १/४ कप तुकडे केलेली
नारळाचे दूध अर्धा कप
साखर २ टेबल स्पून (चवीप्रमाणे, आंब्याच्या गोडीवर अवलंबून)
लिंबाचा रस २ चमचे
आलं १ चमचा बारीक किसलेलं
बर्फ १ कप बारीक तुकडे केलेला
पुदिन्याची पाने ४-५ गार्निशसाठी
कसे तयार कराल?
सर्व साहित्य मिक्सरमध्ये घाला, हायस्पीडवर नीट स्मूथ आणि फ्लफी होईपर्यंत ब्लेंड करा. त्यानंतर पुदिन्याने गार्निश करून चिल्ड सर्व्ह करा.