तुमचा मानसिक आजार असा ओळखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 10:23 AM2023-08-13T10:23:40+5:302023-08-13T10:24:23+5:30

किती जण मानसिक आजारावर बोलतात?

recognize your mental illness | तुमचा मानसिक आजार असा ओळखा!

तुमचा मानसिक आजार असा ओळखा!

googlenewsNext

डॉ. सपना बांगर, मानसोपचारतज्ज्ञ

आपण सगळ्या आजारांवर चर्चा करतो. तज्ज्ञ डॉक्टरांची नावे अनेकांना माहीत असतात. मात्र, किती जण मानसिक आजारावर बोलतात? हा मला पडलेला प्रश्न आहे. सगळ्या आजारांमध्ये एक कारण असते, ते म्हणजे ताणतणाव.  मग तो हृदयविकार घ्या, नाहीतर मधुमेह. आपल्या मनाला झालेली दुखापत आपल्याला दिसत नाही. त्या जखमेवर आपण औषधोपचार करण्याचे प्रयत्न करत नाही. मला काय झालंय एवढं, असे म्हणून स्वतःच त्याचे निदान करून सोईस्करपणे ‘नैराश्य’ आजाराकडे आजही आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते. समाजातील अनेक जणांना आपल्याला मानसिक आजार आहे, हे मान्यच नसते. त्यांना सगळे आजार चालतील; परंतु मानसिक विकार मान्यच होणार नाही. कारण, समाजात आजही या आजाराबाबत उघडपणे बोलताना कुणी धजावत  नाही. कारण, समाज त्याला ‘वेडा’ ठरवितो.

मानसिक आजारसुद्धा इतर आजारांसारखाच आहे. त्यावरसुद्धा योग्य पद्धतीने औषधोपचार घेऊन, समुपदेशन करून तो बरा होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत काही सेलिब्रिटी मानसिक आजाराबद्दल त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. विशेष म्हणजे, समाजातून त्यांना सहकार्य मिळत आहे. त्यांना कुणी हिणवत नाही. मात्र, सामान्य नागरिकामंध्ये आजही या आजाराबद्दल मनात साशंकता असते. आयुष्यात प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर मानसिक आजारांना सामोरे जात असतो.  मानसिक विकाराची शास्त्रीय पद्धतीने व्याख्या करण्यात आली आहे. डिप्रेशन आले तर त्यावर उपचार आहेत. ते व्यवस्थित घेतले तर ती व्यक्ती सर्वसामान्य नागरिकांसारखे आयुष्य जगू शकते. अन्यथा डिप्रेशनमधील व्यक्ती गुणवत्तापूर्वक काम करू शकत नाही. एकाच वेळी मनात अनेक विचारांची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

काही मूलभूत मानसिक विकार

एचडीएचडी विकार : अटेन्शन डेफिसिट, हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हा विकार विशेष करून शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये  आढळून येतो. या विकारामध्ये विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही. ते सतत विसरतात. समजून न घेणे, वर्गात गडबड करणे, शांत न बसणे अशी लक्षणे असतात. हे विद्यार्थी अभ्यासात कमी पडत असल्याने त्यांना ‘ढ’ म्हणून चिडवतात.

सतत काळजी करणे : संबंधित व्यक्ती काही ना काही कारणावरून सतत काळजी करत असते. तसेच अधिक विचारही करत असते. झोप लागत नाही. आत्महत्येचे विचार मनात येत असतात.  

व्यसन विकार : संबंधित व्यक्ती प्रमाणाबाहेर व्यसन करतात. त्यांना कायम वाटत असते की, जर हे व्यसन केले नाही तर त्रास होईल. ते कायम या व्यसनावर अवलंबून असतात. या व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेल्या असतात.  विशेष करून जे अमली पदार्थ, चरस घेतात त्यांना जर या गोष्टी मिळाल्या नाही तर ते स्वतःला किंवा दुसऱ्या व्यक्तींना इजा पोहोचवू शकतात.

खाण्याचा विकार : या विकारात व्यक्ती आपण काही खाल्ले तर वजन वाढेल म्हणून काही खात नाही. काही वेळा त्यांनी काही अतिरिक्त खाल्ले तर उलटी करून बाहेर काढतात.  तर याउलट काही व्यक्ती या विकारात  प्रचंड खात राहतात. त्यांना जेवण कमी मिळाले तर ते खूप त्रागा करतात.

वर्तन विकार : या विकारात व्यक्तीच्या वर्तनात सतत बदल होत असतात. एका वेळी ते खूप आनंदात असतात, तर कधी खूपच दु:खी असतात. तर कधी त्या खूप रागावतात. त्यांचे वागणे सर्वसाधारण नसते. ते विचित्र वागत असतात.

अस्वस्थता विकार : व्यक्ती कायम अस्वस्थ असते. तिची सतत चीड-चीड होत असते. मनात अकारण भीती निर्माण होते. छातीची धडधड वाढलेली असते. एकच विचार मनात वारंवार घोळत राहतो.

‘हे’ मात्र तुम्हाला सांगावे लागेल...

गंभीर मानसिक आजारांनाही बरे करणे सहज शक्य आहे. मात्र, तुमच्यासोबत असे काही तरी घडतेय हे तुम्हाला कुणाला तरी सांगावे लागेल. त्यासाठी तुम्ही मदत मागितली पाहिजे. कारण, मानसोपचार विषयात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागतो. वरवर दिसणाऱ्या गोष्टींवर त्या रुग्णाच्या आजाराचे निदान करू शकत नाही. त्या व्यक्तीशी वेळ घेऊन समुपदेशन करणे गरजेचे असते. अनेक वेळा औषधोपचाराने या व्यक्ती बऱ्या होतात. मानसिक आजारांमध्ये एखादे औषध घेतले तर ते कायम घ्यावे लागते, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.  प्रत्येक औषधाची उपचार पद्धती ठरलेली असते. त्या प्रमाणातच रुग्णांना औषधे दिली जातात.

 

Web Title: recognize your mental illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.