अलर्ट! तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग कधी कधी 'असा' लाल होतो?; गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 03:56 PM2022-02-28T15:56:24+5:302022-02-28T16:03:59+5:30
Redness in Eyes : डोळ्यांचा पांढरा भाग लाल झाला आणि ही स्थिती अनेक दिवस कायम राहिली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
नवी दिल्ली - डोळे लाल होणं (Redness in Eyes) ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या साध्या अॅलर्जीमुळे देखील असू शकते किंवा ट्यूमर इत्यादीमुळे देखील असू शकते. किरकोळ बाब असल्यास स्वच्छतेची काळजी घेऊऩ ही समस्या टाळता येते. परंतु, जर तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग लाल झाला आणि ही स्थिती अनेक दिवस कायम राहिली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही समस्या ब्लड शॉट्स आईजची असू शकते. यामध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागातील बारीक रक्तवाहिन्या पसरतात आणि त्या सुजतात. डोळ्यात कोणताही कचरा गेल्याने, कोणत्याही संसर्गामुळे एका किंवा दोन्ही डोळ्यांचा पांढरा भाग लाल होतो. याशिवाय जळजळ, टोचल्यासारखं वाटणं, खाज सुटणं, कोरडेपणा, वेदना इत्यादी समस्या असू शकतात. या समस्येबद्दल अधिक जाणून घेऊया...
'ही' असू शकतात कारण
अॅलर्जी, डोळ्यांचा थकवा, वायू प्रदूषण, धूळ, माती, रसायन किंवा सूर्यप्रकाश, कॉन्टॅक्ट लेन्सचा दीर्घकाळ संपर्क, डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग होणं उदा., कंजक्टिवाइटिस, ग्लूकोमा, डोळ्यांना दुखापत, कॉर्नियल अल्सर, डोळ्यांची शस्त्रक्रिया इ.
अशा परिस्थितीत तज्ज्ञांना भेटणं आवश्यक
- एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकणारा लालसरपणा
- प्रकाशासाठी अतिसंवेदनशीलता किंवा प्रकाश सहन न होणं
- एका किंवा दोन्ही डोळ्यांमधून स्त्राव किंवा पाणी येणं
- अंधुक दृष्टी
- एका किंवा दोन्ही डोळ्यांत तीव्र वेदना
'असा' करा बचाव
- कॉन्टॅक्ट लेन्स जास्त वेळ घालू नका.
- कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यापूर्वी, त्या पूर्णपणे स्वच्छ करा.
- रसायने किंवा हानिकारक पदार्थांपासून डोळ्यांचे संरक्षण करा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये कोणतेही ड्रॉप्स वापरू नका.
- सूर्याच्या हानिकारक किरणांपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी गॉगल वापरा.
- जर एखाद्याला डोळे लाल होण्याची समस्या असेल तर, त्याच्या संपर्कात आल्यानंतर हात चांगले धुवावेत.
असे आहेत उपचार
डोळे लाल होण्याची समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टर डोळ्यांची तपासणी करून समस्या शोधून काढतात. अॅलर्जीमुळे समस्या असल्यास काही औषधं आणि आय ड्रॉप्स दिले जातात. बॅक्टेरियाच्या संसर्गाच्या बाबतीत तज्ज्ञ प्रतिजैविकांची मदत घेऊ शकतात. जर ट्यूमरची स्थिती निर्माण होत असेल, तर तज्ज्ञ त्यावर दीर्घ काळासाठी उपचार करू शकतात. त्यामुळे डोळे लाल होण्याची समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.