उत्साही सकाळ देईल तुम्हाला नवचैतन्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:44 PM2017-10-24T15:44:45+5:302017-10-24T17:08:08+5:30
झपाटल्यागत पाठी लागलेल्या कामांसाठी एनर्जी मिळवाल कुठून?
- मयूर पठाडे
काहीही करा, कामं कितीही झटपट उरकण्याचा प्रयत्न करा, स्वत:त एनर्जी आणण्याचा प्रयत्न करा, पण कामांची यादीच इतकी लांब, की दिवस संपतो, पण कामांची यादी काही संपत नाही.
प्रत्येकाची हीच तºहा. कामाची टेन्शन्स, वाढत्या जबाबदाºया, त्या वेळेत पूर्ण करण्याचं बंधन.. वेळ आणायचा तरी कुठून?.. आणि त्यासाठीची एनर्जी?.. माणसानं झटायचं तरी किती आणि किती तास? सकाळी दिवस जो सुरू होतो, तो संपायचं नावच घेत नाही. एकामागे एक झपाटल्यागत कामं उरकत राहायचं.. अर्थात त्याला काही पर्यायही नाही. कामांची आणि जबाबदाºयांची ही वाढती यादी ना टाळता येत, ना एका ठराविक मर्यादेपर्यंत पुढे ढकलता येत. त्यासाठी आपल्यालाच कायम सज्ज राहावं लागतं. आपल्यातली एनजी आपल्याला वाढवावी लागते.
कशी वाढवायची ही एनर्जी? कामांसाठी बळ आणायचं कुठून? विशेषत: त्यासाठी जी पॉझिटिव्ह एनर्जी लागते, काहीही झालं तरी निराश न होता, आनंदानं आपलं काम करण्याची जी उर्मी लागते ती मिळवायची कुठून?
काही सोप्या गोष्टींनी आपलं हे ध्येय साध्य होऊ शकतं.
आपल्या दिवसाची सुरुवात ही कायमच प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची असते. पाहा, ज्या दिवशीची सकाळ आपल्याला उत्साहात जाते, तो दिवसही बºयाचदा आनंदी असतो. त्यामुळे आपली सकाळ खराब होणार नाही, सकाळचा मूड चांगला राहील याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. त्यासाठी मेडिटेशन, ध्यानधारणा यांचाही उपयोग करता येईल.
थोडं रिलॅक्स व्हायला शिका. कामाच्या लोंढ्यात स्वत:ला वाहवून घेताना अधूनमधून थोडं थांबा. हे रिलॅक्सेशन तुम्हाला पुढच्या आव्हानांसाठी नवं बळ देऊन जाईल. केवळ टारगेट्सच्या प्रेशरखाली न जगता, वर्तमानात जगायला शिका, हा वर्तमान तुम्हाला बरंच काही देऊन जाईल.
आपल्या आयुष्यात संगीताचा उपयोग अवश्य करा. त्यानं आपल्याला ताणतणावांपासूनही मुक्ती मिळेल. संगीतामध्ये आपल्याला रिलॅक्स करण्याची, ताजंतवानं करण्याची शक्ती आहे. आपला मूडही त्यामुळे चांगला होतो. ही चांगली मनस्थिती तुम्हाला कायम वाढीव शक्ती पुरवते. त्याचा सुयोग्य वापर करा.