रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी पुन्हा गरम करून खाता का? वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 09:49 AM2024-01-20T09:49:30+5:302024-01-20T09:50:23+5:30
जास्तीत जास्त घरांमध्ये रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी गरम करून किंवा त्याला फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाल्ला जातो.
भारतात जास्तीत जास्त लोक जेवताना भात खातात. अनेकांना तर भात असल्याशिवाय जेवणही जात नाही. भात हा आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. आजकाल अनेक वजन वाढण्याची समस्या होते. अशात लोकांना वाटतं की, त्यांनी भात खाल्ला तर वजन वाढतं. पण भात आवडणारे लोक भात खाणं काही सोडत नाहीत.
जास्तीत जास्त घरांमध्ये रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी गरम करून किंवा त्याला फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाल्ला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, एकदा शिजवलेल्या भाताला पुन्हा एकापेक्षा जास्त वेळ गरम करणं धोक्याचं ठरू शकतं. असं केल्यास तुम्हाला उल्टी, पोट बिघडणे यासोबतच हृदयाशी संबंधीत आजारही होऊ शकतात.
एक्सपर्टचा सल्ला
ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कच्च्या तांदुळामध्ये बॅसिलस सेरस नामक बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया तांदूळ शिजवल्यावरही जिंवत राहतात. एक्सपर्टनुसार, तुम्ही एकदा शिजवलेला भात पुन्हा केवळ एकदाच गरम करु शकता. एकापेक्षा जास्तवेळ हा भात गरम केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो.
होतात 'या' समस्या
पुन्हा पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने तुम्हाला उल्टी, लूज मोशन, पोट दुखणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे एक्सपर्ट हे तांदूळ शिजवल्यावर एका तासाच्या आत फ्रिजमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. कारण त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.