तुमच्या पालकांना असेल डायबिटीस तर तुम्हालाही डायबिटीस होण्याचा धोका! अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:54 PM2022-08-18T14:54:31+5:302022-08-18T14:56:22+5:30
एखाद्या व्यक्तीच्या पालकांपैकी एकाला डायबेटिस असेल तर त्या व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका असतो. अनुवंशिकतेमुळे डायबेटिसचा धोका टाळण्यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे.
डायबेटिस (Diabetes) हा गंभीर स्वरुपाचा आजार आहे. डायबेटिसमुळे हृदय, किडनी आणि डोळ्याचे विकार होण्याची शक्यता असते. डायबेटिस असलेल्या रुग्णाला ब्लड शुगर पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. डायबेटिस होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव तसंच अनुवंशिकता (Heredity) आदी कारणं सांगितली जातात. त्यात अनुवंशिकता हे कारण महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्याचप्रमाणे बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) तरुणांना डायबेटिस होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पालकांपैकी एकाला डायबेटिस असेल तर त्या व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका असतो. अनुवंशिकतेमुळे डायबेटिसचा धोका टाळण्यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. `अमर उजाला`ने या विषयीची माहिती दिली आहे.
डायबेटिस होण्यामागे अनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण आहे. डायबेटिसमुळे अन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे डायबेटिस हा आजार `सायलेंट किलर` (Silent Killer) असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अनुवंशिकतेमुळे डायबेटिस होऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी करणं गरजेचं आहे. तणाव (Stress) आणि कमी प्रमाणात झोप यामुळे डायबेटिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी 6 ते 8 तास शांत झोप (Sleep) घेणं गरजेचं आहे. यामुळे तणावही नियंत्रणात येतो. तसंच तुम्हाला चिंता आणि तणाव जास्त प्रमाणात जाणवत असेल तर तुम्ही योगासनं, मेडिटेशनच्या मदतीनं या गोष्टी नियंत्रणात आणू शकता. तणाव आणि झोपेकडे पुरेसं लक्ष दिल्यास डायबेटिसचा धोका कमी करता येतो.
जर तुम्हाला डायबेटिस असेल किंवा नसेल, अशा दोन्ही स्थितीत तुम्ही नियमित व्यायाम (Exercise) करणं आवश्यक आहे. योगासनं, व्यायामामुळे शरीराची निष्क्रियता कमी होते आणि पर्यायाने डायबेटिसचा धोका कमी होतो. जे लोक रोज व्यायाम करतात, त्यांच्या तुलनेत जे व्यायाम करत नाहीत त्यांना ब्लड शुगर पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे.
डायबेटिस हा प्रामुख्याने जीवनशैली आणि मेटाबॉलिझमशी संबंधित आजार आहे. जर डायबेटिसची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तर तुम्हाला या आजारापासून दूर राहण्यासाठी जीवनशैली योग्य ठेवावी लागेल. तसंच तुमच्या जोखमीचे घटक जाणून घेत, दर सहा महिन्यांनी संपूर्ण शरीराची तपासणी करावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या वाढण्यापूर्वी तिचं निदान होईल. वर्षाला शारीरिक आणि डोळ्यांची तपासणी करण्याव्यतिरिक्त, तुम्ही वर्षातून दोन वेळा डायबेटिस तपासणी करणं गरजेचं आहे. यामुळे डायबेटिसचा धोका टाळता येऊ शकतो.
डायबेटिसची संभाव्य जोखीम टाळण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार (Diet) गरजेचा आहे. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, कारली तसेच हंगामानुसार फळांचा समावेश करावा. साखरेचे सेवन मर्यादित असावं. तसंच शक्य असल्यास साखर आणि गोड पदार्थ खाणं टाळावं. जेवणाची वेळ निश्चित असावी. दोन जेवणामध्ये 3 ते 4 तासांपेक्षा जास्त अंतर नसावं. या सर्व गोष्टींमुळे अनुवंशिकता असली तरी डायबेटिस होण्याचा धोका कमी होऊ शकतो.