मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 01:01 PM2018-08-06T13:01:45+5:302018-08-06T13:03:32+5:30
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यादरम्यान महिलांची प्रकृती फार नाजूक असते. तसेच यादिवसांत स्वच्छतेबाबतही विशेष लक्ष द्यावे लागते. या दिवसांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिला अनेक रोगांच्या शिकार होतात.
(Image creadit : thedoctor.pk)
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यादरम्यान महिलांची प्रकृती फार नाजूक असते. तसेच यादिवसांत स्वच्छतेबाबतही विशेष लक्ष द्यावे लागते. या दिवसांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिला अनेक रोगांच्या शिकार होतात. जर नीट स्वच्छता राखली नाही तर त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे महिलांना या दिवसांत स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. स्वच्छता राखल्यानं बॅक्टेरियल इन्फेक्शपासूनही बचाव होतो. जाणून घेऊयात मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.....
- आपल्या देशांत अद्याप अनेक महिला सॅनिटरी नॅपकिन्सपासून वंचित आहेत. त्याऐवजी त्या कापड, राख, झाडांची पानं यांसारख्या गोष्टींचा वापर करतात. शहरातही अनेक महिला अजूनही कापडाचा सर्रास वापर करतात. पण यांसारख्या गोष्टींचा वापर केल्यानं महिलांना अनेक आजार जडण्याची शक्यता असते. त्याच कापडाचा पुन्हा पुन्हा धुवून वापर केल्यानं त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात. अशातच सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर केल्यामुळे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.
- काही महिला पूर्ण दिवस एकाच सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. पण असं करणं घातक ठरू शकतं. मासिक पाळीदरम्यान पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दर 6 तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलणं गरजेचं असतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
- मासिक पाळीदरम्यान महिलांना नेहमी चांगल्या आणि स्वच्छ सॅनिटरी नॅपकिनचा वापर करणं गरजेचं असतं. त्यादरम्यान होणारा रक्तस्राव सॅनिटरी नॅपिनमध्ये पूर्णपणे शोषलं जाणं गरजेचं असतं. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
- यादरम्यान होणाऱ्या त्वचेच्या समस्या फार गंभीर नसतात. पण स्वच्छता न राखल्यामुळे काही समस्या उद्भवतात. त्यामुळे मासिक पाळी आणि त्यानंतरच्या दिवसांतही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये.
- या दिवसांत होणाऱ्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी अॅन्टीसेप्टिक क्रिमचा वापर करता येऊ शकतो. पण कोणत्याही क्रिमचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
- मासिक पाळीच्या दिवसांत त्वचेच्या समस्या अथवा इतर अन्य समस्या उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही औषधाचा वापर अथवा सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापर करावा.