टॅटू काढून घेताय; सुई, शाई तपासली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 12:17 PM2022-08-14T12:17:01+5:302022-08-14T12:17:25+5:30
हॅपीटायटीसची लागण होत असल्याचे उघड
मुंबई : सध्या तरुणाई सोबत वयस्कर नागरिकांनाही शरीरावर टॅटू काढून घेण्यास आवडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र टॅटू काढणे आरोग्याच्या दृष्टीने काही वेळा घातक ठरू शकते. काही दिवसांपूर्वीच, उत्तर प्रदेशात अशा पद्धतीने टॅटू शरीरावर गोंदवून घेणे भलतेच महागात पडले आहे.
वाराणसीत टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वापर केल्याने काही जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. तर टॅटू काढण्यासाठी जी शाई वापरण्यात येते त्यांच्याद्वारे हेपेटायटीस सी च्या लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे टॅटू काढताना आता नवीन शाई आणि नवीन सुई घेतली आहे का, याची तपासणी टॅटूप्रेमींना करावी
लागणार आहे.
सध्या सर्वच शहरात टॅटू काढून देण्याचे सलून मोठ्या प्रमाणात उघडले आहेत. विशेष करून कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्यांमध्ये टॅटूबाबत मोठी क्रेझ आहे.
टॅटूप्रेमी आपल्या शरीराच्या विविध भागावर कलरफुल टॅटू काढून घेत असतात. तर काही जण टॅटू कोणत्या डिझाइनचा असावा किंवा आवडत्या व्यक्तीच्या नावाचा असावा, असे विविध विचार करून ते टॅटू काढण्यासाठी जातात. मात्र, यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काही अडचणी निर्माण होतील का, याकडे मात्र सर्रास दुर्लक्ष करतात. फार कमी नागरिक आरोग्याच्या दृष्टीने टॅटू
काढणाऱ्यास विविध प्रश्न विचारताना आढळतात.
लक्षणे
टॅटू काढल्यानंतर सतत ताप येणे, कावीळ सारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखविणे.
या तापसण्यामध्ये डॉक्टरांना कोणता विकार झाला आहे हे कळून येते.
यकृताची रक्तचाचणी करून हेपेटायटिसचे निदान करता येते.
सुईतून संसर्गाची शक्यता
वाराणसी येथे टॅटू काढताना एकच सुई अनेकांसाठी वापरली गेली होती. त्यामुळे अनेकांना एकच संसर्ग झाल्याची घटना घडली होती. ज्या माणसावर टॅटू काढण्यात येणार आहे त्याला जर काही कुठल्या आजाराचा संसर्ग असेल तर सुईच्या माध्यमातून तो संक्रमित घटक शाईत उतरू शकतो. त्यामुळे टॅटू काढताना तो तज्ज्ञ व्यक्तीकडूनच काढून घ्यावा.
मधुकर गायकवाड,
जेजे, औषध शास्त्र विभाग