'असे' लोक जगतात जास्त आणि आनंदी आयुष्य, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:58 PM2024-06-19T12:58:35+5:302024-06-19T12:59:26+5:30
हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे.
सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांनी आयुष्य जास्त जगावं. त्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टीही करत असतात. कुणी समाधानी आयुष्य जगतात, कुणी योगा करतात तर कुणी एक्सरसाइज करतात तर कुणी चांगला आहार घेतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, सकारात्मक विचार करणारे लोक इतर लोकांच्या तुलनेत सरासरी ११ ते १५ टक्के जास्त जगतात.
हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, सकारात्मक विचार करणारे लोक केवळ जास्त आयुष्य जगतात असं नाही तर अनेक आजारांना आपल्या जवळही येऊ देत नाहीत. सकारात्मक विचार करणारे लोक आनंदी राहतात आणि निराशेपासून चार हात दूर राहतात. ज्यामुळे ते हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मानसिक आजारांपासून सुरक्षित राहतात.
सकारात्मक विचारांच्या लोकांना इम्यून सिस्टीमसंबंधी समस्यांचा धोकाही ३५ टक्के कमी राहतो. या रिसर्चमध्ये ६९,७४४ महिला आणि १४२९ पुरूषांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासकांनुसार, सकारात्मक लोक जीवनातील समस्यांकडे चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि आपल्या आरोग्याचीही काळजी घेतात. अशा लोकांमध्ये डिप्रेशनची समस्याही कमी बघायला मिळते. ते चिंता, दु:खं सहजपणे हॅंडल करतात.
हे लोक हेल्दी डाएट फॉलो करण्यासोबतच नियमितपणे व्यायाम करतात आणि स्मोकिंगपासून दूर राहतात. नकारात्मक विचार असणारे लोक आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाहीत. ते सतत तणावात असतात, चिडचिड करतात आणि नकारात्मक विचार करतात. ज्यामुळे त्यांच्या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण नेहमी जास्त असतं. ज्यामुळे ते अनेक आजारांचे शिकार होतात.
रिसर्चनुसार, केवळ २५ टक्के लोकच जन्मापासून सकारात्मक विचारांचे असतात. असंही समोर आलं आहे की, सोशल कनेक्शनच्या माध्यमातूनही सकारात्मक विचार डेव्हलप केले जाऊ सकतात. नकारात्मक विचार ओळखून आणि ते सकारात्मक विचारांमध्ये बदलून आशावाद वाढवला जाऊ शकतो.