संशोधन स्त्रियांना सांगतय की सहा महिने स्तनपान कराच, नाही तर बाळाला तरूण वयातच होवू शकतो यकृताचा गंभीर आजार!
By admin | Published: June 13, 2017 06:50 PM2017-06-13T18:50:18+5:302017-06-13T18:50:18+5:30
सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईनं स्तनपान केलं नाही तर बाळाला त्याच्या किशोरअवस्थेतच ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ होण्याची दाट शक्यता असते.
- माधुरी पेठकर
स्तनपानाच्या महत्त्वाबद्दल गेल्या काही वर्षापासून सतत जनजागृती होत आहेत. आधुनिक विचारसरणी, गतिमान जीवनशैली या कचाट्यात सापडलेल्या कित्येक स्त्रिया मात्र आजही स्तनपानाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात. बाळाला संपूर्ण वर्षभर किमान सहा महिने तरी स्तनपान करणं यात फक्त बाळाचाच नव्हे तर स्तनपान करणाऱ्या स्त्रीचाही तेवढाच फायदा होतो. आपली फिगर बिघडेल या भितीपोटी स्तनपान न करणाऱ्या स्त्रियांना हे माहित नसतं की बाळांतपणानंतर स्त्रिला आपल्या पूर्वावस्थेत आणायला स्तनपानच महत्त्वाची भूमिका बजावत असतं. आणि हेच स्तनपान बाळाच्या नुसत्या वाढीलाच नव्हे तर बाळाला पुढे त्याच्या भविष्यात होणाऱ्या आजारापासूनही वाचवतं. स्तनपानासंदर्भात नुकतंच झालेलं संशोधन सांगत की जर सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईनं स्तनपान केलं नाही तर बाळाला त्याच्या किशोरअवस्थेतच ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ होण्याची दाट शक्यता असते.
संशोधन सांगतं की ज्या आया आपल्या बाळांना सहा महिन्यापेक्षाही कमी स्तनपान करतात आणि सहा महिन्याच्या आतच बाळाला बाहेरचं दूध किंवा पावडरचं दूध पाजतात त्यांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ होतो. आणि तोही अगदी त्यांच्या किशोर वयात. मुळात हा आजार प्रौढ व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. दर चार पैकी एकाला हा आजार असल्याचं दिसून येतं. यकृतातील पेशींमध्ये चरबीचं प्रमाण वाढलं की यकृत जराही अल्कोहोल पचवू शकत नाही. या आजारात स्थूलपणा प्रचंड वाढतो आणि शरीरातील इन्शुलिन निर्मितीवर हा आजार थेट आक्रमण करतो. संशोधन हेच सांगतं की किशोरवयातील मुला मुलींमध्ये जेव्हा हा आजार आढळून येतो त्याचा थेट संबंध त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेल्या दूधाशी असतो. सहा महिन्यापेक्षाही कमी काळ ज्यांना आईचं दूध मिळालेलं असतं त्यांच्यामध्ये हा आजार होण्याची शक्यता 40 टक्के असते. म्हणूनच अभ्यासक स्त्रियांना संशोधनाचा आधार घेऊन आपल्या बाळांना पूर्ण सहा महिने स्तनपान करण्याचा आग्रह करत आहेत. सहा महिन्याच्या आत मुलांना बाहेरचं दूध आणि पावडरचं दूध न देता आयांनी मुलांना स्तनपानच करावं असं संशोधकांचं म्हणणं आहे.
हे संशोधन असंही सांगतं की ज्या स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या सुरूवातीलाच स्थूलता (ओबेसिटी) असते त्यांच्या मुलांमध्ये किशोरवयात लिव्हरचे आजार होण्याची शक्यता दुप्पट असते. आणि ज्या स्त्रियांचं गरोदरपणाआधी योग्य आणि प्रमाणशीर वजन असतं आणि ज्या स्त्रिया सहा महिने आणि त्यापेक्षा अधिक काळापर्यंत बाळाला व्यवस्थित स्तनपान करतात त्यांच्या मुलांचे यकृत (लिव्हर) पुढे भविष्यातही सुदृढ राहातं.
शिवाय ज्या स्त्रिया गरोदरपणातही धूम्रपान करतात त्यांच्या मुलांमध्ये ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ होण्याचा धोका जास्त असतो. या अभ्यासानं गरोदरपणात स्त्रियांनी स्वत:च्या सुदृढतेकडे आणि बाळांतपणानंतर स्तनपानाकडे विशेष लक्ष पुरवायला सांगितलं आहे. कारण हीच काळजी त्यांच्या मुलांना भविष्यात लिव्हरच्या आजाराच्या मोठ्या धोक्यापासून वाचवू शकते.