Research : चिरकाल तरुण ठेवणारे औषध तयार होणार !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2017 06:12 AM2017-02-25T06:12:39+5:302017-02-25T11:42:39+5:30
चिरकाल तरुण ठेवणारे म्हणजेच वार्धक्याला दूर ठेवणारे औषध येत्या दोन-तीन वर्षात तयार करणे शक्य असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Next
आपण तरुणच राहावे, म्हणजे वार्धक्य यायलाच नको असे प्रत्येकाला वाटते. मात्र जसे वय वाढत जाते तशी वृद्धापकाळाची जाणीव होऊ लागते. बहुतांश वार्धक्य कुणालाच आवडत नाही. नेहमी तारुण्य टिकविण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक संशोधनही केलेत पण आतापर्यंत यश मिळाले नाही. मात्र लोमोस्कोव मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी व स्वीडनची स्टॉकहोम युनिव्हर्सिटी यांनी मायटोकाँड्रियाची वार्धक्याच्या प्रक्रियेतील नेमकी भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार चिरकाल तरुण ठेवणारे म्हणजेच वार्धक्याला दूर ठेवणारे औषध येत्या दोन-तीन वर्षात तयार करणे शक्य असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
संशोधनात वैज्ञानिकांनी उंदरांमध्ये वार्धक्याची प्रक्रिया लांबवणारे कृत्रिम संयुग तयार केले आहे. कृत्रिम अँटिआॅक्सिडंट असलेल्या एसकेक्यू १ या संयुगाच्या मदतीने मायटोकाँड्रियावर प्रयोग करण्यात आले. जनुक संस्कारित उंदरावर त्याचे प्रयोग करण्यात आले असून त्याच्या जिनोममध्ये उत्परिवर्तन घडवून म्युटाजेनेसिसला उत्तेजन देण्यात आले होते. त्यामुळे या उंदरांमध्ये वार्धक्याची प्रक्रिया लवकर होऊन तो उंदीर नेहमीच्या जीवनकालाऐवजी दोन वर्षांत मरत असे. त्यामुळे वयामुळे होणारे विकार उंदरांना होत असत. १०० दिवस वयाच्या जनुकीय उंदरापासून एसकेक्यू १ या संयुगाचे प्रयोग करण्यात आले. वैज्ञानिकांच्या मते त्यात मायटोकाँड्रियातून निघणाऱ्या मुक्तकणांपासून पेशींचे रक्षण होते. उंदरांच्या दोन गटांवर २०० ते २५० दिवस प्रयोग करण्यात आले. ज्या उंदरांमध्ये हे संयुग वापरले नव्हते ते लवकर वृद्ध झाले. काही उंदरांमध्ये वार्धक्याने शरीराचे तापमान कमी होणे, मणक्याला बाक येणे, त्वचा खराब होणे असे परिणाम वयानुसार दिसून येतात. शिवाय आॅक्सिजनचे वहन बरोबर होत नाही. हे संशोधन महत्त्वाचे असून त्यामुळे मायटोकाँड्रियाची वार्धक्यातील भूमिका समजली आहे, असे लोमोनोसोव मॉस्को स्टेट विद्यापीठाचे व्लादिमीर स्कुलाचेव यांनी सांगितले. यातून वृद्धत्वाची प्रक्रिया रोखणारे औषध दोन-तीन वर्षांत तयार करता येऊ शकेल.