वाढत्या तापमानात किती काळ तुमच्या हृदयाची धडधड टिकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 08:13 PM2019-07-25T20:13:53+5:302019-07-25T20:16:20+5:30

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं.

rising temperature affecting human body | वाढत्या तापमानात किती काळ तुमच्या हृदयाची धडधड टिकेल?

वाढत्या तापमानात किती काळ तुमच्या हृदयाची धडधड टिकेल?

Next

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं. दिल्लीत ४८ अंश, तर राजस्थानात ढोलपूरसारख्या ठिकाणी ५१ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानानं नागरिक अक्षरश: पोळून निघाले.अर्थातच हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम. त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय. एकाच परिस्थितीत दीर्घ काळ राहिल्यानंतर माणसाच्या किंवा कुठल्याही प्राण्याची ती गोष्ट सहन करण्याची क्षमता वाढत जाते, हे खरं असलं तरी, त्यालाही काही नैसर्गिक मर्यादा आहेच. मग तापमान सहन करण्याची माणसाच्या शरिराची क्षमता नेमकी आहे तरी किती? शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधनातून काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
तापमानाच्या संदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे आपल्या शरिराचं तापमान आणि दुसरं म्हणजे बाह्य वातावरणाचं तापमान.

परिस्थितीनुसार आणि क्षमतेनुसार प्रत्येकाची सहनक्षमता वेगवेगळी असली तरी शरीराचं तापमान ३६ ते ३७.५ अंश सेल्सिअस या मर्यादेत असताना मानवी शरीर उत्तम काम करतं. शरीराचं तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं तर मात्र चिंताजनक परिस्थिती ओढवते.
दुसरी गोष्ट बाह्य तापमानाची. बाह्य तापमान वाढत गेलं की अर्थातच आपल्या शरिराचं तापमानही वाढत जातं. बाह्य तापमान जर ५४ अंश सेल्सिअस किंवा १३० फॅरनहिटच्या पलीकडे गेलं आणि अशा वातावरणात जास्त काळ आपण वावरलो तर मृत्यूची शक्यता वाढते. यात पुन्हा दोन प्रकार. अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी. अल्प कालावधी काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपासून तर दीर्घ कालावधी काही तासांपासून एक-दोन दिवसांपर्यंतचा असू शकतो.

अगदी अत्यल्प काळ सर्वाधिक उष्णता सहन करण्याची क्षमता इराणमध्ये नोंदवली गेली आहे आणि हे तापमान होतं जवळपास ७३ अंश सेल्सिअस आहे. थंडीपेक्षा उष्णता सहन करण्याची मानसाची क्षमता थोडी जास्त आहे. त्यामुळेच थंडीमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या जास्त ऐकायला येतात. अर्थात उष्माघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

शरिरांतर्गत आणि बाह्य उष्णता वाढत गेली की त्याचा परिणाम श्वासोच्छवासावर होतो. वातावरणात ओझोन वायूचं प्रमाण वाढलं की उष्णता वाढते. हा ओझोन आपल्या फुफ्फुसांच्या पेशीही कमजोर करतो. त्यामुळे श्वसनाचा त्रास सुरू होतो. वाढत्या उष्म्यामुळे आलेला घाम आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अतिरिक्त घामामुळे आपल्या रक्ताची घनता वाढते. घट्ट झालेलं हे रक्त शरीरभर पोहोचवण्यास हृदयाला जास्त कष्ट पडतात आणि हृदय जास्त वेगानं धडधडायला लागतं. प्रमाणाबाहेर पोहोचलेली ही धडधड झेपेनाशी झाली, की मग आपलं हृदय कायमचंच थांबतं.


 

Web Title: rising temperature affecting human body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.