‘जंक फूडमधून लहानग्यांना अन्नपदार्थांच्या अॅलर्जीचा धोका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:55 AM2019-07-08T06:55:26+5:302019-07-08T06:55:30+5:30
लहानग्यांच्या आहारशैलीतून जंकफूडला बाद केले पाहिजे.
मुंबई : लहानग्यांमध्ये जंकफूडची निर्माण होत असलेली आवड ही घातक ठरण्याची शक्यता आहे. जंकफूडचा मुलांचा आग्रह पुरविला गेल्यास व आठवड्यातून त्याचे त्यांच्याकडून तीनदा सेवन झाल्यास लहान मुलांसाठी ते अधिकच हानिकारक ठरणार असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, मायक्रोवेव्ह आणि तळलेल्या पदार्थांचे सातत्याने सेवन केल्यास, त्यातून लहानग्यांना अन्नपदार्थांच्या अॅलर्जीचा धोकाही संभावतो, असे निरीक्षण या अहवालात नोंदविले आहे.
लहानग्यांच्या आहारशैलीतून जंकफूडला बाद केले पाहिजे. अशा पद्धतीच्या पदार्थांमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम होत आहे. अल्पवयीन मुलांनी आठवड्यात तीनदा याचे सेवन केल्यास, त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यताही अधिक असते, असे आहारतज्ज्ञ सोनिया शहा यांनी सांगितले. जंकफूडमधील फॅट्समुळे जंकफूडचे व्यसन लागते. हे व्यसन लागल्यानंतर आहारात बदल करणेही अनेकांना कठीण होत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे, तसेच या गोष्टींमुळे सतत खाण्याची इच्छा होते आणि जंक फूड खावे, असेच वाटते. त्यामुळे शरीराला गरज नसतानाही मीठ, साखर आणि फॅट शरीरात जातात. त्यामुळे लठ्ठपणा वाढत असल्याचेही संशोधकांनी अहवालात स्पष्ट केले आहे.
आहारशैलीत बदल करण्याची गरज-आहारतज्ज्ञ
आहारतज्ज्ञ डॉ.कल्पिता ननावरे यांनी सांगितले की, एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर पोट दुखणे, जुलाब लागणे, अंगावर रॅश येणे, सर्दी, खोकला, धाप, तोच पदार्थ पुन्हा खाल्ल्यावर पुन्हा तीच लक्षणे दिसत असल्यास, त्या अन्नपदाथार्ची अॅलर्जी असू शकते. गेल्या काही वर्षांत ६ ते १२ वयोगटांतील लहानग्यांमध्ये जंकफूडच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे, ते नियंत्रित केले पाहिजे.