कोरोनानंतर मुलांना स्ट्रोकचा धोका; 'या' संकेतांकडे करू नका दुर्लक्ष, पालकांचं वाढलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:39 AM2023-09-03T11:39:05+5:302023-09-03T11:45:23+5:30
कोरोनाने प्रत्येक वयोगटावर वाईट परिणाम केला आहे.
कोरोना महामारीनंतर आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे अनेक कारणे आहेत जसे की कमकुवत प्रतिकारशक्ती, हवामानातील बदल, सोशल डिस्टंसिंगचा अभाव, निरोगी सवयींचं पालन न करणे इ. कोरोनाने प्रत्येक वयोगटावर वाईट परिणाम केला आहे. आता एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना संसर्गानंतर मुलांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अमेरिकेत केलेल्या या संशोधनाचा अहवाल 'पेडियाट्रिक न्यूरोलॉजी' जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
मार्च 2020 ते जून 2021 दरम्यान रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे स्ट्रोक आलेल्या रुग्णालयात दाखल झालेल्या 16 रुग्णांची माहिती आणि निदान प्रक्रियेचा अभ्यासात आढावा घेण्यात आला. यातील बहुतेक प्रकरणे फेब्रुवारी ते मे 2021 च्या दरम्यान आली आहेत, मुलांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर काही दिवसांनी हे झालं आहे. यापैकी निम्म्या नमुन्यांमध्ये, ज्यांना पूर्वी कोविड संसर्ग नव्हता, तपासणीत संसर्ग आढळून आला.
16 पैकी एकाही नमुन्यात गंभीर संसर्ग दिसून आला नाही आणि काही रुग्ण लक्षणं नसलेले होते, असं संशोधकांनी सांगितलं. ते म्हणाले की, यापूर्वी 5 रुग्णांना कोविड संसर्ग झाला नसल्याची पुष्टी झाली होती. यूटा युनिव्हर्सिटीचे आरोग्य तज्ज्ञ आणि प्रमुख संशोधक मॅरिग्लेन जे. वीलेयुक्स यांनी सांगितले की, मुलांमध्ये स्ट्रोक येण्याचा धोका तुलनेने कमी आहे, परंतु कोरोनानंतर धोका आहे.
मुलांमध्ये स्ट्रोकची लक्षणं
- अचानक पॅरालिसीस किंवा अशक्तपणा (विशेषत: चेहरा, हात किंवा पाय).
- अचानक बोलण्यात किंवा समजण्यात अडचण.
- अचानक डोळ्यांच्या समस्या (जसे की अंधुक किंवा डबल दिसणं).
- डोकेदुखी, जी तीव्र आणि अचानक आहे.
- चक्कर येणे, संतुलन किंवा समन्वयात समस्या
- उलट्या किंवा मळमळ
- शुद्ध हरपणं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.