फटाक्यांमधील केमिकल्समुळे 'या' गंभीर आजारांचा धोका, गर्भपातही होऊ शकतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:00 PM2018-11-01T12:00:11+5:302018-11-01T12:01:26+5:30
फटाक्यांनी पर्यावरणाचं नुकसान तर होतंच सोबतच यातील हानिकारक रसायनामुळे आरोग्यालाही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
(Image Credit : Channel 1)
भारतातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळी...दिवाळी हा रोषणाईचा सण म्हणून साजरा केला जातो. घरांची सजावट, रंगरंगोटी, फराळ याने हा फराळ सर्वात खास होतो. घरातील प्रत्येक व्यक्ती या उत्सवात मनमुराद आनंद लुटत असतात. पण यात भरपूर प्रमाणात फटाके वापरुन या सणाला गालबोट लावण्याचं काम केलं जातं. फटाक्यांनी पर्यावरणाचं नुकसान तर होतंच सोबतच यातील हानिकारक रसायनामुळे आरोग्यालाही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यातील रसायनामुळे वेगवेगळ्या समस्यांचा धोका वाढतो. ते कोणते खालीलप्रमाणे सांगता येतील.
फुफ्फुसाचा कॅन्सर
फटाक्यांमध्ये असलेलं पोटॅशिअम क्लोरेट हे प्रकाश निर्माण करतं, पण या फटाक्यामुळे हवा विषारी होते. या केमिकलमधून निघणाऱ्या धुरामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. जर आधीच कुणाला श्वासाची समस्या असेल किंवा फुफ्फुसासंबंधी काही समस्या असेल तर हा धोका अधिक वाढतो.
श्वासासंबंधी समस्या
फटाक्यांमध्ये कर्णकर्कश आवाजासाठी आणि प्रकाशासाठी गन पावडरचा वापर केला जातो. यामुळे सल्फर डायऑक्साइड गॅस तयार होतो. या गॅसमुळे वातावरण प्रदूषित होतं आणि श्वासासंबंधी आजार होण्याचा धोकाही वाढतो. यासोबतच हा गॅस अॅसिड रेनचंही कारण बनतो, त्यामुळे जीवालाही मोठा धोका होतो. तसेच वातावरणात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढल्याने दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो.
अल्झायमरसारखा गंभीर आजार
फटाक्यात पांढरा प्रकाश निर्माण करण्यासाठी अॅल्यूमिनियमचा वापर केला जातो. हे तत्व त्वचेसाठी फार हानिकारक असतं. याच्या वापराने डर्मेटायटिससाऱखा आजार होऊ शकतो. त्यासोबतच हा फटाका जाळल्यावर यातून निघणाऱ्या गॅसने लहान मुलांच्या मेंदूवरही वाईट प्रभाव पडतो आणि याने त्यांना अल्झायमर होण्याचाही धोकाही वाढतो.
गर्भपाताचा धोका
फटाक्यातून निघणारा हानिकारक कार्बन मोनोऑक्साइड गॅस श्वासाच्या माध्यमातून गर्भात वाढत असलेल्या बाळापर्यंत पोहोचतो. त्यामुळे या बाळा श्वासासंबंधी समस्येचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. अनेकदा काही वेगळ्या प्रकारचे विकारही यामुळे होऊ शकतात. या गॅसमुळे गर्भपात होण्याचाही धोका असतो.
डोळ्यांची समस्या
फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं. याने टॉक्सिन सुद्धा फार वाढतं. या टॉक्सिनमुळे डोळ्यांवर फार वाईट परिणाम होतो. डोळ्यांमध्ये जळजळ आणि डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे या दिवसात डोळ्यांची खास काळजी घ्यावी.
हाय ब्लड प्रेशर
काही फटाक्यांमधील मर्करीमुळे असा गॅस निघतो ज्यामुळे श्वासासंबंधी आजार आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते. जर आधीच कुणाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर त्यांची समस्या आणखीन वाढू शकते.
बाळांच्या विकासात अडथळा
गर्भवती महिलांसाठी फटाक्यातून निघणारा हानिकारक गॅस वेगवेगळ्या प्रकारे घातक ठरु शकतो. महिलांच्या श्वासाव्दारे शरीरात जाणाऱ्या गॅसमुळे पोटातील गर्भाच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडचण येऊ शकते.
हृदयरोगाची समस्या
फटाक्यांमधून निघणाऱ्या हानिकारक गॅसमुळे हृदयरोगांची समस्याही वाढू शकते. ज्या लोकांना आधीच हृदयरोग आहे, त्यांना फटाक्यांच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. तसेच विषारी गॅसमुळे श्वास रोखला जाण्याचीही समस्या होऊ शकते.
हार्मोनल डिसऑर्डर
फटाक्यांमधून निळा प्रकाश यावा यासाठी त्यात तांब्याचा वापर केला जातो. यातून निघणाऱ्या गॅसमुळे अनेकप्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो आणि हार्मोनल डिसऑर्डरचं कारणही ठरु शकतो. हार्मोनल डिसऑर्डरमुळे लहान मुलांची उंची आणि आरोग्यही प्रभावित होतं.