गुलाबाच्या पाकळ्यांचा चहाची वाढती क्रेझ, जाणून घ्या फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 10:53 AM2018-08-09T10:53:45+5:302018-08-09T10:54:54+5:30
गुलाबाच्या फुलाबाबत असे म्हटले जाते की, गहू ज्याप्रमाणे शरीर मजबूत करतं त्याचप्रमाणे गुलाब मेंदूला मजबूत करतं. चला जाणून जाणून घेऊ गुलाबाच्या चहाचे फायदे.....
(Image Credit : Amazon.in)
अलिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या पदार्थांच्या चहाची चांगलीच क्रेझ वाढली आहे. ग्रीन टी असो वा लेमन टी यासोबतच आता रोज टी सुद्धा चांगलीच लोकप्रिय होत आहे. रोज टी म्हणजे हा चहा गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जातो. गुलाबाच्या चहाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. गुलाबाच्या फुलाबाबत असे म्हटले जाते की, गहू ज्याप्रमाणे शरीर मजबूत करतं त्याचप्रमाणे गुलाब मेंदूला मजबूत करतं. चला जाणून जाणून घेऊ गुलाबाच्या चहाचे फायदे.....
कसा तयार कराल गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा?
सर्वातआधी एक किंवा दोन गुलाबाचे फूलं घ्या. दोन कप पाणी गरम करा. या पाण्यात गुलाबाची फुलं टाका. १० मिनिटांनी हे पाणी गाळून कपात काढा. यात थोडं मध आणि थोडा लिंबाचा रस मिश्रत करा. तुमचा गुलाब चहा तयार आहे. असे सांगितले जाते की, दिवसातून दोन किंवा तीनवेळा हा चहा घेतला तर वजन कमी होण्यास मदत होते. सोबतच तुमची त्वचाही चमकदार होते.
गुलाब चहाचे फायदे
गुलाबाच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए, बी३, सी, डी आणि ई आढळतात. या चहामुळे तुमची त्वचा आणखी तजेलदार आणि चमकदार दिसते. त्यासोबतच या चहामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. तसेच याने तुमची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
व्हिटॅमिन सी चा स्त्रोत
गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा हा व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आहे. व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरासाठी एका अॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर तुम्हाला थंडी वाजत असेल किंवा ताप आला असेल तर हा गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा तुम्हाला फायदा देईल.
अॅंटी-ऑक्सिडेंट अधिक असतं
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाणही अधिक असतं. या चहामध्ये पॉलिफेनोल अॅटी-ऑक्सिडेंट, एंथोकायनिन, एलागिक अॅसिड आणि क्वरेटिन सुद्धा असतं. हे सर्व अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरासाठी फायदेशीर आहेत.