भात की चपाती?; रात्रीच्या जेवणात काय खाणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर, डॉक्टर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 05:43 PM2024-08-04T17:43:17+5:302024-08-04T17:43:46+5:30
आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्तम पर्याय कोणता हे अनेकांना माहीत नाही. भात की चपाती... रात्रीच्या जेवणात काय खाणं चांगलं याबद्दल जाणून घेऊया....
चपाती आणि भात हे दोन्ही जेवणातील अत्यंत महत्त्वाचे पदार्थ आहेत. दोन्ही आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर मानले जातात. मात्र नक्की ते कधी खावेत याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. काही लोक रात्री भात खाणं योग्य मानतात तर काही लोक रात्रीच्या जेवणात फक्त चपाती खातात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्तम पर्याय कोणता हे अनेकांना माहीत नाही. भात की चपाती... रात्रीच्या जेवणात काय खाणं चांगलं याबद्दल जाणून घेऊया....
चपाती खाण्याचे फायदे
चपातीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. चपाती खाल्ल्याने पोट लवकर भरतं, त्यामुळे जास्त खाण्याची शक्यता कमी होते. चपातीमध्ये फायबर, प्रोटीन जास्त प्रमाणात असतात. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियमचे प्रमाण चांगले असते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी भाताइतकी लवकर वाढत नाही.
भात खाण्याचे फायदे
भातात कार्बोहाइड्रेट असतात जे शरीराला ऊर्जा देतात. चपातीच्या तुलनेत भातामध्ये आहारातील फायबर, प्रोटीन कमी प्रमाणात असते. त्यात कॅलरीज जास्त असतात. भातामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने ते पचण्यास सोपं असतं, तर चपाती पचायला वेळ लागतो. भातात फोलेटचे प्रमाण जास्त असते, जे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. परंतु बाजारात उपलब्ध असलेला पांढरा तांदूळ हा अत्यंत पॉलिश केलेला असतो, त्यामुळे त्यातील बहुतांश सूक्ष्म पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे भात खायचा असेल तर ब्राऊन राइस निवडणं उत्तम असं म्हटलं जातं.
कोणता पर्याय जास्त चांगला?
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, अपोलो हॉस्पिटल्सच्या चीफ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी रात्री चपाती खाण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यात भरपूर फायबर असते आणि पोट जास्त काळ भरलेले राहते. रात्री दोन चपात्या, एक वाटी डाळ किंवा एक वाटी भाजी खाणं चांगलं असतं. पण जर तुम्हाला भात आवडत असेल आणि रात्री भात खाण्याची इच्छा असेल तर खिचडी बनवा आणि त्यात भरपूर मसूर आणि भाज्या घाला. यामुळे पोट भरलेले राहते आणि शरीराला पोषक तत्वेही मुबलक प्रमाणात मिळतात. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.