बागेत धावणे चांगले की ट्रेडमिलवर? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 10:47 AM2018-11-22T10:47:54+5:302018-11-22T10:48:13+5:30
फिटनेससाठी धावणे ही सर्वात चांगली एक्ससाइज मानली जाते. आजही अनेकजण बाहेर गार्डनमध्ये तर काही लोक जिममध्ये ट्रेडमिलमध्ये धावताना दिसतात.
फिटनेससाठी धावणे ही सर्वात चांगली एक्ससाइज मानली जाते. आजही अनेकजण बाहेर गार्डनमध्ये तर काही लोक जिममध्ये ट्रेडमिलमध्ये धावताना दिसतात. धावल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो आणि मांसपेशींना मजबूती मिळते. तसेच धावल्याने हृदयासंबंधी अनेक आजारांपासूनही बचाव होत असल्याचा दावा अनेक शोधातून करण्यात आला आहे. जर तुम्ही रोज ३० मिनिटे किंवा १ तास धावाल तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि वेगवेगळे आजार दूर पळतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की, बाहेर मोकळ्या जागेत धावणे चांगले की जिममध्ये ट्रेडमिलवर धावणे चांगले? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
कुठे धावणे अधिक फायद्याचे?
खरंतर धावण्यासाठी कोणती जागा योग्य आहे हे तुमच्या परिस्थितीतवर निर्भर करतं. सामान्यपणे मोकळ्या हवेत धावायला जाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण याने तुमच्या शरीरात स्वच्छ ऑक्सिजन जातं. पण जर तुम्ही प्रदुषित शहरात राहत असाल किंवा तुम्ही ज्या बागेत धावायला जाता, त्याच्या आजूबाजूला सतत वाहने ये-जा करत असतील तर अशात ट्रेडमिलवर धावणे चांगलं राहिल.
बागेत धावण्याचे फायदे
बागेत धावायला जाणे हे तुमच्यासाठी चांगलं ठरेल, पण त्यासाठी तिथे स्वच्छ हवा असणे गरजेचे आहे. मोकळ्या जागेत ऑक्सिजन जास्त असतं. अशात जर तुम्ही धावायला जाता त्या बागेत खूपसारी झाडे आहेत. तर तिथे धावायला जाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. धावताना आपण वेगाने श्वास घेतो, त्यामुळे संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होतो. तसेच धावताना रक्तातील प्रवाह सुद्धा वाढतो, जे शरीरासाठी चांगलं असतं.
बागेत धावण्याचे नुकसान
आजकाल शहरात ज्याप्रकारे प्रदुषण वाढलं, ते पाहता मोकळ्या ठिकाणी श्वास घेणंही कठीण झालं आहे. जर तुम्ही प्रदुषण असलेल्या परिसरात किंवा शहरात राहत असाल तर हे धावणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं ठरणार नाही. हवेत असलेले छोटे विषारी कण श्वासासोबत फुफ्फुसात शिरतात. याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. तसेच पावसाच्या दिवसात चिखल आणि पावसामुळे तुम्ही बाहेर किंवा बागेत धावायला जाऊ शकत नाहीत.
ट्रेडमिलवर धावण्याचे फायदे
ट्रेडमिलवर धावणे सोपे असते.कारण बाहेर धावाताना ज्याप्रकारे हवेच्या प्रतिरोधाचा सामना करावा लागतो. तसा यावर धावताना करावा लागत नाही. त्यासोबतच वातावरण बिघडल्यावर किंवा उन्हाळ्यात बाहेर धावणे कठीण होऊन बसतं. पण ट्रेडमिलवर तुम्ही कधीही, कोणत्याही वातावरणात धावू शकता.
ट्रेडमिलवर धावण्याचे नुकसान
ट्रेडमिलवर धावताना तुम्हाला बाहेरची ताजी हवा मिळत नाही. बाहेरच्या शुद्ध हवेत तुम्ही जास्त वेळ आणि चांगला व्यायाम करु शकता. तर ट्रेडमिलवर धावून तुम्हाला काही दिवसांनी कंटाळा येऊ लागतो. रोज एकाच जागेवर, एकाच गतीने धावल्याने लोक अनेकदा कंटाळा करुन धावणे सोडून देतात. तेच बाहेर किंवा बागेत धावताना तुम्ही काहीना काही बघत असता, त्यामुळे कंटाळा येत नाही.