अरे व्वा! हवेतील कोरोनाच्या प्रसाराला रोखता येणार; लसीनंतर रशियानं तयार केलं अनोखं मशिन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 03:02 PM2020-08-30T15:02:10+5:302020-08-30T15:11:52+5:30
या मशिनद्वारे काही सेकंदात हवेद्वारे पसरत असलेल्या व्हायरसबाबत माहिती मिळवता येऊ शकते.
कोरोना व्हायरसच्या माहामारीनं जगभरात गेल्या 4 महिन्यांपासून हाहाकार पसरवला आहे. जगभरातील शास्त्रज्ञांचे कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी संशोधन सुरू आहे. दरम्यान कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्याबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. हवेतील बॅक्टेरिया, विषारी पदार्थ, व्हायरसचा शोध घेणं हे खूप कठीण काम आहे. आता रशियन तज्ज्ञांनी हवेतील बॅक्टेरिया, व्हायरसला डिटेक्ट करणारं एक मशिन तयार केलं आहे. या मशिनद्वारे काही सेकंदात हवेद्वारे पसरत असलेल्या व्हायरसबाबत माहिती मिळवता येऊ शकते. इतकंच नाही तर या मशीनच्या माध्यमातून व्हायरसच्या प्रसाराचा स्त्रोतही कळू शकतो.
शुक्रवारी मॉस्कोच्या सैन्य औद्योगिक मंच 2020 मध्ये केमिस्ट्री बायो नावाचं उपकरण दाखवण्यात आलं. हे मशिन KMZ फैक्ट्रीद्वारे तयार करण्यात आलं आहे. या मशिनला विकसित करणारे तज्ज्ञ गामालेया इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीचा भाग आहेत. ज्या कंपनीद्वारे जगातील पहिली कोरोना लस लॉन्च करण्यात आलेली या रशियन कंपनीतील तज्ज्ञ हे मशिन तयार करत आहेत . डिटेक्टर बायो पॉकेट कोणत्याही मशिनप्रमाणे दिसत नसून रेफ्रेजरेटर प्रमाणं दिसतं. याचा आकार लेअर केक डिजाईनमध्ये तयार करण्यात आला आहे. या मशिनच्या प्रत्येक लेअरमधून तपासणी केली जाते.
या मल्टीपल लेअर्स मशीनच्या माध्यमातून हवेत प्रसारित होत असलेल्या व्हायरसची माहिती मिळू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार योग्य परिणाम दिसून येण्यासाठी दोन टप्प्यातील चाचणी प्रक्रियेतून जावं लागतं. पहिल्या टप्प्यात आजूबाजूच्या हवेतील नमुने एकत्र केले जातात. 10 ते 15 सेकंदात व्हायरस, बॅक्टेरिया आणि विषारी बॅक्टेरियांना डिटेक्ट केलं जातं. त्यानंतर विस्तृत विश्लेषण केलं जातं. या प्रक्रियेसाठी 2 तासांचा कालावधी लागतो. हे मशिन जगभरातील गर्दीच्या ठिकाणी वापरात असावं असं तज्ज्ञांचे मत आहे. मेट्रो, रेल्वे स्टेशन, विमानतळं अशा सार्वजनिक ठिकाणी या मशिनचा वापर केला जाऊ शकतो.
दरम्यान कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल 79,000 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या सात दिवसांमध्ये 4,96,070 नवे रुग्ण आढळले आहेत. जगभरात सात दिवसांत असलेल्या रुग्णसंख्येत भारतातील संख्या ही सर्वाधिक आहे. कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटात देशात आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हे पण वाचा-
हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा
तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा