'हा' एक पदार्थ ठरतोय वजन कमी करण्यासाठी रामबाण, संशोधनात दावा; जाणून घ्या अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 05:59 PM2022-01-04T17:59:50+5:302022-01-04T18:02:16+5:30
स्वीडनमधील चल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. राय हे उत्तर भारतातील थंड प्रदेशात होणारं तृणधान्य आहे.
गहू (Wheat) आणि रायपासून (Rye) बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात, असा आत्तापर्यंत समज होता. परंतु, रायपासून तयार केलेले पदार्थ वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी देखील प्रभावी ठरतात, असा दावा स्वीडनमधील चल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. राय हे उत्तर भारतातील थंड प्रदेशात होणारं तृणधान्य आहे.
दैनंदिन आहारात राययुक्त पदार्थांचा समावेश केल्यास फायदेशीर ठरतं. शरीराचं वजन आणि चरबीवर (Fats) तृणधान्यांचा कशा प्रकारे परिणाम होतो, याचं मूल्यांकन या अभ्यासातून करण्यात आलं. रायवर विशेष लक्ष केंद्रीत करणारा हा पहिला अभ्यास आहे. लठ्ठपणा आणि अतिरिक्त वजन हे जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक आव्हान आहे. यासाठी विविध उपाययोजनांची गरज भासते. भूक लागण्याच्या भावनेवर नियंत्रण आणि चयापचयावर सकारात्मक परिणाम करणारी फूड प्रॉडक्टस (Food Products) विकसित करणं हे उद्दिष्ट असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. या संशोधनाचे निष्कर्ष क्लिनिकल न्युट्रिशन जर्नलमध्ये (Clinical Nutrition Journal) प्रकाशित झाले आहेत.
या संशोधनात 30 ते 70 वर्षं वयोगटातील 242 किलोग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेल्या पुरुष आणि महिलांचा समावेश करण्यात आला होता. सहभागी व्यक्तींना ठराविक कालावधीकरिता समान कॅलरीज असलेले प्रक्रियायुक्त गहू आणि त्याच प्रमाणात रायपासून तयार केलेले पदार्थ दिले गेले. यादरम्यान सहभागी व्यक्तींमध्ये अनेक बदल दिसून आले.
संशोधकांच्या मते, राय आणि गव्हापासून बनवलेले पदार्थ खाणाऱ्या दोन्ही गटांतील व्यक्तींचे वजन कमी झाल्याचे संशोधनादरम्यान दिसून आले. विशेष म्हणजे ज्यांनी राययुक्त पदार्थ खाल्ले त्यांचे वजन गव्हाचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सरासरी एक किलोग्रॅम अधिक कमी झाले. तसेच चरबीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. भिन्न लोकं एकाच अन्नावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतात, हे यातून दिसून आलं.
जाणकार काय म्हणतात?
चर्ल्मस युनिव्हर्सिटीतील अन्न आणि पोषण विज्ञान विभागाचे मुख्य संशोधक किआ नोहर इव्हर्सन यांनी सांगितलं की ``संशोधनाचे निष्कर्ष आश्चर्यजनक होते. ज्या सहभागी लोकांनी रायपासून बनवलेले अन्न पदार्थ खाल्ले होते, त्यांचे वजन लक्षणीय कमी झाल्याचं दिसून आलं. यासोबतच त्यांच्या शरीरातील फॅट्सची पातळी तुलनेत कमी झाल्याचं दिसून आलं``.
मात्र, संशोधकांनी याबाबत इशाराही दिला आहे. `असं का होतं? हे जाणून घेण्यासाठी या संशोधनावर अजून काम करणं गरजेचं आहे`, असं संशोधकांनी सांगितलं. आतड्यातील काही बॅक्टेरिया (Bacteria) यास कारणीभूत ठरू शकतात का यावर सध्या आम्ही संशोधन करत आहोत, असं संशोधकांनी स्पष्ट केलं. जे लोक राय अधिक प्रमाणात सेवन करतात, त्यांच्यामध्ये फायबरचं (Fiber) प्रमाण जास्त असतं. जे लोक प्रक्रियायुक्त गव्हापासून (Refined Wheat) तयार केलेले पदार्थ सेवन करतात, त्यांच्या तुलनेत रायपासून तयार केलेले पदार्थ खाणारे व्यक्ती हे अधिक ऊर्जावान असतात, असं मागील अभ्यासात दिसून आलं आहे.