सॅनिटरी नॅपकिन, मुलांचे डायपर तुम्ही कचऱ्यात फेकता? हा व्हीडीओ पहा, स्वत:ची लाजच वाटेल!

By admin | Published: May 8, 2017 03:21 PM2017-05-08T15:21:17+5:302017-05-08T15:29:57+5:30

सॅनिटरी नॅपकिन, मुलांचे डायपर्स डस्टबिनमध्ये आणि उघड्यावर फेकण्यापूर्वीविचारा स्वत:ला की, कुणी हे सारं आपल्या घरात फेकलं तर?

Sanitary napkin, kids diapers you throw in the trash? Watch this video, you will feel ashamed! | सॅनिटरी नॅपकिन, मुलांचे डायपर तुम्ही कचऱ्यात फेकता? हा व्हीडीओ पहा, स्वत:ची लाजच वाटेल!

सॅनिटरी नॅपकिन, मुलांचे डायपर तुम्ही कचऱ्यात फेकता? हा व्हीडीओ पहा, स्वत:ची लाजच वाटेल!

Next

- अनन्या भारद्वाज

त्या चार दिवसांविषयी तसंही अजून आपल्याकडे उघड बोलायची चोरीच आहे. अगदी सॅनिटरी नॅपकिन विकत घ्यायचं तरी लोकांच्या नजरा चुकवत जाणाऱ्या आणि तिथं जावून ते हळूच मागणाऱ्या अनेकजणी आपल्या आसपास आहेत. आपणही त्यातल्याच एक. सॅनिटरी नॅपकिन्सचं पाकिट विकत घेतलं की दुकानदार ते व्यवस्थित बांधून देणार आणि मग आपण हळूच एखाद्या पिशवीत घालून ते घरी आणणार. कुणाच्या नजरेस पडू नये असं ठेवणार. ते स्वच्छ नॅपकिन सुद्धा आपण असं मारे जपून वापरतो.
आणि त्याचं काम झाल्यावर मात्र कसंबसं कागदात गुंडाळून किंवा काहीजणीत तर तसंच डस्टबिनमध्ये टाकून देतात. रस्त्यावरच्या उघड्या कचऱ्याकुंड्यात फेकतात. आणि ते फेकण्यात काहीही लाज वाटणं तर दूरच पण आपण चुकतोय असंही वाटत नाही. असं का? कचरा वर्गीकरण करणाऱ्या माणसांच्या आरोग्याचा, त्यांना येणाऱ्या वासाचा, किळस येण्याचा आपण काही विचार करतो का? तर नाहीच! हा एवढा बेफिकीरपणा आपल्यात कुठून येतो? सार्वजनिक आरोग्याविषयी आपण एवढ्या का उदासीन असतो?
जे सॅनिटरी नॅपकिनचं तेच मुलांच्या डायपरचं. शी-शूने गच्चं भरलेले डायपरही असेच कचऱ्यात टाकले जातात. उघड्यावर फेकले जातात.
काहीजणी तर हे नॅपकिन किंवा डायपर सुद्धा शौचालयात फ्लश करतात. ( करू नका, डस्टबिनमध्ये टाका असं लिहिलेलं असूनही हे सर्रास होतं.)
यासंदर्भातच प्रश्न विचारणारा हा व्हिडीओ.
तो म्हणतो तुमच्या आॅफिसच्या ड्रॉवरमध्ये किंवा घरात कुणी असा कचरा टाकला तर तुम्हाला चालेल का?
मग तुम्ही तो बाहेर कसा टाकता?
कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा किती त्रास होतो.
त्यापेक्षा हे नॅपकिन्स किंवा डायपर एखाद्या कागदात व्यवस्थित गुंडाळा. त्याची तोंड बंद करा. आणि मग त्यावर एक मोठ्ठं लाल रंगाचं भरीव वर्तुळ करा. आणि फक्त सुक्या कचऱ्यात टाका. म्हणजे कचरा विगतीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कळेल की हा सॅनिटरी कचरा आहे. तो न उघडता त्याची विल्हेवाट लावता येवू शकेल.
ही सारी माहिती स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था लिमिटेड या स्वयंसेवी संघटनेच्या फेसबुकपेजवर पाहता येवू शकते. ‘स्वच्छ’नेच तयार केलेला आणि आपल्या फेसबुकवर पेज प्रसारीत केलेला हा व्हीडीओ, शुद्ध मराठीत अत्यंत नेमकी माहिती देतो.
आपण स्वत: तर हा व्हीडीओ पहावाच, पण आपल्या मैत्रणींनाही दाखवावा, यासंदर्भात जनजागृती ही आपल्या भल्याची आणि सामाजिक स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे..
हा व्हीडीओ नक्की पहा..
 

Web Title: Sanitary napkin, kids diapers you throw in the trash? Watch this video, you will feel ashamed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.