रुग्णांना उपयुक्त ठरणारी दोन कृत्रिम हदयं तयार; जवळपास सगळेच हृदयविकार बरे होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 05:32 AM2021-06-04T05:32:28+5:302021-06-04T05:32:50+5:30
या संशोधनामुळे हृदयासंदर्भातले जवळपास सारेच विकार बरे करण्यास यश येईल अशी अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली आहे.
हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे. जगात अनेक लोक याच आजारानं मृत्युमुखी पडतात. याशिवाय लाखो, करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात. आपल्या कमजोर हृदयासह अनेकांना पुढचं सारं आयुष्य भीतभीतच काढावं लागतं. आजकाल हृदयविकारावर प्रभावी उपचार असले, या विकाराचे लोक पुढेही अनेक वर्षे जगत असले तरी हजारो लोकांना हार्ट ट्रान्सप्लान्टेशनचीही गरज पडते. अर्थातच हृदयदाते कमी असल्यानं जगभरात त्यासाठीची मोठी वेटिंग लिस्ट आहे. रुग्णांना आणि हॉस्पिटल्सना वर्षानुवर्षे दात्यासाठी वाट पाहावी लागते. आजवर कृत्रिम हृदयाचे अनेक प्रयोग झाले असले, तरी ते तितकेसे प्रभावी ठरलेले नाहीत. त्यात निरंतर संशोधन सुरूच आहे. या कृत्रिम हृदयांनी अर्थातच रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करतानाही बऱ्याचदा ठरावीक कालावधीसाठी या कृत्रिम हृदयाचा उपयोग केला जातो.
पण हृदयरोग्यांसाठी दोन महत्त्वाच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. कृत्रिम हृदयाचं संशोधन आणखी पुढे गेलं असून फ्रान्स आणि ऑस्ट्रिया या देशांत संशोधकांनी दोन नवीन कृत्रिम हृदयं तयार केली आहेत. रुग्णांना ती अधिक उपयुक्त ठरतील आणि या संशोधनामुळे हृदयासंदर्भातले जवळपास सारेच विकार बरे करण्यास यश येईल अशी अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली आहे.
फ्रेंच कंपनी कारमॅटनं संपूर्णपणे कृत्रिम असं हृदय बनवलं असून, जुनं हृदय काढून हे संपूर्ण नवीन हृदय रुग्णाच्या शरीरात बसवता येऊ शकतं. मानवी हृदयाप्रमाणेच त्याचं कार्य चालत असल्यानं रुग्णाला सहजपणे चालता, फिरता येईल. रुग्ण जेव्हा काही काम करीत असेल, त्या वेळी शरीरातील रक्तप्रवाह वाढेल आणि तो जेव्हा आराम करीत असेल, तेव्हा रक्तप्रवाह आपोआप हळू, स्थिर होईल. हे हृदय मानवी शरीरात बसविल्यानंतर प्रतिकूल रिॲक्शन्स तर येणार नाहीतच, पण या हृदयाला भविष्यात ‘मेन्टेनन्स’चीही गरज नाही, असं संशोधकांचं म्हणणं आहे. सध्या १९ रुग्णांना हे कृत्रिम हृदय बसविण्यात आलं असून ते निरीक्षणाखाली आहेत. २५ वर्षांपासून हे संशोधन सुरू होतं. या संशोधनाला - उत्पादनाला युरोपियन युनियनमध्ये विक्रीची मान्यताही मिळाली असून, जर्मनीमध्ये जूनअखेरीस ते उपलब्ध होऊ शकेल, अशी कंपनीला आशा आहे. सध्या तरी हे हृदय केवळ पुरुषांसाठीच ‘फिट’ असून महिलांसाठी ते आकारानं मोठं ठरत आहे. त्यावरही संशोधन सुरू आहे.
ऑस्ट्रियाच्या संशोधकांनी यापुढे पाऊल टाकलं असून त्यांनी नुकतंच एक मिनी कृत्रिम हृदय बनवलं आहे. मानवी स्टेम सेलपासून बनवलेलं हे हृदय पहिल्यांदाच एखाद्या लॅबमध्ये तयार करण्यात आलं आहे. तिळीच्या बीजाच्या आकाराचं हे हृदय केवळ दोन मिलीमीटर आहे. आईच्या पोटातील २५ दिवसांच्या गर्भाप्रमाणे हे हृदय कार्य करतं. गर्भात असतानाच बाळामध्ये हृदयासंदर्भातील अनेक विकार विकसित होतात. ते का होतात, याचा शोध वैज्ञानिकांची टीम करत असताना त्यांनी हा आश्चर्यजनक शोध लावला.
या टीमचे प्रमुख संशोधक डॉ. साशा मेंडजन सांगतात, जेव्हा पहिल्यांदा या हृदयाला काम करताना मी पाहिलं तेव्हा माझ्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावार राहिला नाही. बारा वर्षांची आमची कठोर मेहनत सफल झाली. लॅबमध्येसुद्धा हे मिनी हृदय तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ धडधडत होतं. प्रसिद्ध बायोइंजिनीअर जेन मा यांचं यासंदर्भात म्हणणं आहे, जन्मजात हृदयविकार तसेच हृदयाच्या इतरही आजारासंदर्भात हा शोध अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल.
हेच नाही, जगभरात अजूनही अनेक कंपन्या आणि संशोधक कृत्रिम हृदय निर्मितीच्या प्रयत्नांत आहेत. २०३० पर्यंत; येत्या आठ-दहा वर्षांतच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी तंत्रज्ञानाची बाजारपेठ तब्बल ४० अब्ज डॉलर्सचा टप्पा सहज पार करेल असं मार्केट रिसर्च कंपनी ‘आयडीटेक’चं म्हणणं आहे. आणखी एक फ्रेंच कंपनी - कॉरवेव्ह - हृदयात थोडासाच बिघाड झालेल्या लोकांसाठी एक डिव्हाइस विकसित करीत आहे. हे यंत्र संपूर्ण हृदयाची जागा घेण्याऐवजी हृदयाच्या एका कक्षातून रक्त पंप करण्यास मदत करेल. थोड्याच कालावधीत जागतिक बाजारात ज्याला जसं हवं तसं आणि ज्याची जशी ऐपत आहे त्याप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध होतील आणि हृदयाच्या दराबाबत तुम्हाला थोडीफार घासाघीसही करता येईल.
चीननंही तयार केलंय कृत्रिम हृदय!
जोपर्यंत आपण तीच गोष्ट पुन्हा नव्यानं करू शकत नाही, तोपर्यंत अनेक गोष्टी आपल्याला समजत नाहीत. लॅबमध्ये हे मिनी हृदय आम्ही पुन्हा तयार करू शकलो, याचा आम्हाला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया डॉ. साशा मेंडजन यांनी दिली. हे संशोधन आणखीही विकसित होईल आणि मानवाला खऱ्या अर्थानं जीवनदान मिळेल, असं अनेक संशोधकांचं म्हणणं आहे. याआधी चीननंही कृत्रिम हृदय तयार करण्याचा दावा केला होता.