आता जेल टाळणार गर्भधारणा; कॉन्डम, गर्भनिरोधक गोळ्यांची गरज नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:09 PM2018-12-04T16:09:45+5:302018-12-04T16:10:48+5:30
शरीर संबंधांदरम्यान कमी होणार स्पर्म्सचं प्रमाण
मुंबई: शरीर संबंधादरम्यान पुरुषांना कॉन्डम वापरायचं नसेल आणि महिलांना साईड इफेक्टच्या भीतीनं गर्भनिरोधक गोळ्या घ्यायच्या नसतील, तर अनेकदा समस्या उद्भवतात. मात्र एका जेलच्या वापरामुळे ही समस्या सुटू शकते. शरीर संबंधादरम्यान पुरुषांना वापरता येतील, असं गर्भनिरोधक तयार करण्यात संशोधकांना यश आलं आहे. पॉप्युलेशन काऊन्सिल आणि एनआयएचच्या युनिस केनेडी श्रिवर यांनी एका जेलची निर्मिती केली आहे. शरीर संबंधांवेळी या जेलचा वापर केल्यास पुरुषांमधील स्पर्मचं प्रमाण अतिशय कमी होतं. त्यामुळे गर्भधारणेची शक्यतादेखील कमी होते.
पुरुषांसाठी गर्भनिरोधक जेलची निर्मिती करण्यात डॉ. डायना ब्लिथे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 'अनेक महिला साईड इफेक्ट्सच्या भीतीनं गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर टाळतात. तर पुरुषांसाठी असलेले गर्भनिरोधक कॉन्डम आणि नसबंदीपर्यंतच मर्यादित आहेत. त्यामुळे गर्भनिरोधक क्षेत्रात हे जेल अतिशय परिणामकारक ठरुन सार्वजनिक आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल,' असा विश्वास ब्लिथे यांनी व्यक्त केला.
पुरुषांसाठी गर्भनिरोधक म्हणून काम करणाऱ्या या जेलला एनईएस/टी असं नाव देण्यात आलं आहे. हे जेल पुरुष आपल्या पाठीला आणि खांद्यांना लावू शकतात. यानंतर हे जेल त्वचेतून शरीरात प्रवेश करतं. या जेलमध्ये टेस्टोस्टेरॉनसोबत सेजेस्टेरॉन वापर करण्यात आलं आहे. सेजेस्टेरॉन पुरुषांच्या शरीरात उपलब्ध असलेल्या टेस्टेस्टेरॉनची नैसर्गिक निर्मिती थांबवतं. त्यामुळे स्पर्म निर्माण होण्याचं प्रमाण काही वेळासाठी खूप कमी होतं. मात्र याचवेळी रिप्लेसमेंट टेस्टेस्टेरॉन शरीर संबंधांसाठी आवश्यक असणाऱ्या शरीरातील इतर क्रिया सुरूच ठेवतं. लवकरच याची चाचणी जगभरातील 420 जोडप्यांवर केली जाणार आहे. हे जेल नेमकं किती प्रभावी आहे, याबद्दलची माहिती चाचणीतून मिळू शकेल.