कॅन्सरच्या नव्या उपचाराचा शोध, शरीरावर होणार नाही कोणताही वाईट प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 10:06 AM2019-08-07T10:06:30+5:302019-08-07T10:11:25+5:30
वैज्ञानिकांनी कॅन्सरच्या उपचारासाठी एका नवीन पद्धतीचा शोध लावला आहे. या नव्या उपचार पद्धतीमुळे कोणताही वाईट प्रभाव होणार नाही.
जगभरात दिवसेंदिवस कर्करोग म्हणजेच कॅन्सरच्या आजाराचं थैमान अधिकच वाढत आहे. तर दुसरीकडे या आजारावर मात करण्यासाठी सतत संशोधने सुरू आहेत. अशात वैज्ञानिकांनी कॅन्सरच्या उपचारासाठी एका नवीन पद्धतीचा शोध लावला आहे. या नव्या उपचार पद्धतीमुळे कोणताही वाईट प्रभाव होणार नाही.
सध्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान शरीरावर फार वाईट प्रभाव पडतो. ज्यात अनीमिया, भूक न लागणे, ब्लीडिंग, जखम होणे, पोट बिघडणे, डायरिया, थकवा, केसगळती, मळमळ होणे, लैंगिक समस्या आणि यूरिनसंबंधी समस्यांचा समावेश आहे.
कॅन्सरवरील उपचाराचा हा नवा रिसर्च जर्नल ऑफ बायलॉजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालाय. वैज्ञानिकांनी न्यूरोफायब्रोमॅटोसिस टाइप २ चा अभ्यास करताना हा शोध लावला. सामान्यपणे या स्थितीला एनएफ २ चं रूप मानलं जातं आणि यात श्वानोमास नर्वस सिस्टीममध्ये ट्यूमरचा विकास होतो.
बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिक्सचे प्राध्यापक मॅका फ्रेंको म्हणाले की, 'सतत वाढत राहण्यासाठी ट्यूमर सेल्सना ऊर्जा आणि ब्लॉक्सचं उत्पादन करण्याची गरज असते'. अभ्यासकांना आढळलं की, श्वानोमास सेल्स एक ऑक्सिडेंट आणि नायट्रेटिंग एजेंट, पेरोक्सिनायट्रेटचं उत्पादन करतं. ज्याने प्रोटीनमध्ये टायरोसिन या अमिनो असिड निर्माण होतं.
प्रसिद्ध लांसेट ऑन्कोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१८ ते २०४० पर्यंत जगभरात दरवर्षी कीमोथेरपी करणाऱ्यांची संख्या ५३ टक्क्यांनी वाढून ९८ लाख ते १.५ कोटी होईल. राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि वैश्विक स्तरावर कीमोथेरपीसाठी पहिल्यांदा रिसर्चमध्ये याप्रकारचं आकलन केलं गेलं होतं. मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सरच्या रूग्णांची वाढती संख्या बघता कॅन्सरवर उपचार करणाऱ्या साधारण १ लाख डॉक्टरांची गरज भासेल.