कोरोना झाल्यानंतरही कोरोनाची लक्षणं दिसतात? संशोधकांनी सांगितले असा ओळखा लाँग कोव्हिड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 07:08 PM2022-08-18T19:08:49+5:302022-08-18T18:35:01+5:30

काही रुग्णांमध्ये कोरोना होऊन गेल्यानंतरही दीर्घ काळ त्याची लक्षणं जाणवतात. याला लॉंग कोविड (Long Covid) असं म्हणतात. कोणत्या रुग्णावर लॉंग कोविडचा प्रभाव दिसून येईल आणि कोणत्या रुग्णावर दिसणार नाही, याचा अंदाज सुरुवातीच्या टप्प्यात लावता येत नव्हता. परंतु, यावर येल युनिव्हर्सिटीच्या (Yale University) संशोधकांनी संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत. या निष्कर्षानुसार, लॉंग कोविड कधी आणि का वाढतो हे सांगता येणार आहे.

scientists found symptoms of long covid in corona patient | कोरोना झाल्यानंतरही कोरोनाची लक्षणं दिसतात? संशोधकांनी सांगितले असा ओळखा लाँग कोव्हिड

कोरोना झाल्यानंतरही कोरोनाची लक्षणं दिसतात? संशोधकांनी सांगितले असा ओळखा लाँग कोव्हिड

googlenewsNext

जगभरातल्या अनेक देशांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनाचा (Corona) कहर आहे. सध्या जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी या रोगाचं संकट दूर झालेलं नाही. कोरोनाचा संसर्ग झालेल्या किंवा होऊन गेलेल्या रुग्णाला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. काही रुग्णांमध्ये कोरोना होऊन गेल्यानंतरही दीर्घ काळ त्याची लक्षणं जाणवतात. याला लॉंग कोविड (Long Covid) असं म्हणतात. कोणत्या रुग्णावर लॉंग कोविडचा प्रभाव दिसून येईल आणि कोणत्या रुग्णावर दिसणार नाही, याचा अंदाज सुरुवातीच्या टप्प्यात लावता येत नव्हता. परंतु, यावर येल युनिव्हर्सिटीच्या (Yale University) संशोधकांनी संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत. या निष्कर्षानुसार, लॉंग कोविड कधी आणि का वाढतो हे सांगता येणार आहे.

कोरोनामुळे संबंधित रुग्णाला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. कोरोनापश्चात लॉंग कोविडचा त्रास होण्याची शक्यता असते; पण हा त्रास होईल की नाही, हे सांगणं तसं अवघड असतं. एका संशोधनामुळे आता हा अंदाज लावता येणार आहे. आठ टक्के अमेरिकी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लॉंग कोविडशी संबंधित कोणत्या ना कोणत्या परिणामांचा सामना करावा लागतो, असं अमेरिकेची आरोग्य एजन्सी असलेल्या सीडीसीचा (CDC) अहवाल सांगतो.

द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कोरोनाचा संसर्ग झालेल्या दर आठपैकी एका व्यक्तीमध्ये या विषाणू संसर्गातून बरं झाल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत शरीरात लॉंग कोविडचं किमान एक लक्षण (Symptom) दिसून आलं आहे. मार्च 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत नेदरलॅंडमधल्या 76,400 हून अधिक प्रौढ व्यक्तींचा या अनुषंगाने अभ्यास करण्यात आला. या प्रौढ व्यक्तींना 23 सर्वसामान्य कोरोना लक्षणांच्या अनुषंगाने एक ऑनलाइन प्रश्नावली भरून देण्यास सांगण्यात आलं होतं. त्यापैकी 4200 पेक्षा अधिक म्हणजेच 5.5 टक्के व्यक्तींनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली. यापैकी 21 टक्क्यांहून अधिक व्यक्तींना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात तीन ते पाच महिन्यांनी कोरोनाचं किमान एक नवीन लक्षण दिसून आलं. कोरोना झालेल्यांपैकी 12.7 टक्के म्हणजेच आठपैकी एका व्यक्तीमध्ये कोरोनाचं एक लक्षण निश्चितपणे आढळून आलं आहे.

संशोधकांनी लॉंग कोविडची जोखीम जाणून घेण्यासाठी 215 व्यक्तींवर संशोधन केलं. यापैकी 99 टक्के व्यक्ती लॉंग कोविड झालेल्या होत्या. 44 व्यक्ती अशा होत्या, की ज्यांच्यात कोविडची लक्षणं दिसलेली नाहीत. तसंच 76 व्यक्ती अशा होत्या की ज्या कोरोनातून रिकव्हर झाल्या होत्या. परंतु, त्यांच्यात दीर्घकालीन गुंतागुंत नव्हती. लॉंग कोविडग्रस्त रुग्णांमध्ये थकवा (Weakness) आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या ही सर्वांत सामान्य लक्षणं दिसून आली.

येल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितलं, की `स्ट्रेस हॉर्मोनवरून (Stress hormone) लॉंग कोविडचं रहस्य समजू शकतं. कोरोनातून बरं झाल्यानंतर, रुग्णाच्या शरीरात सामान्य निरोगी व्यक्तीपेक्षा 50 टक्के जास्त प्रमाणात कॉर्टिसॉल (Cortisol) हे स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतं. यामुळे लॉंग कोविड होण्याचा धोका जास्त असतो.`

रुग्णाच्या शरीरात असा कोणता बदल होतो, जो लॉंग कोविडसाठी कारणीभूत ठरतो, हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी रुग्णांच्या रक्ताचे नमुने (Blood Sample) जमा केले आणि त्यांची तपासणी केली. या तपासणीतून कॉर्टिसोल हॉर्मोनची पातळी वाढली असल्याचं दिसून आलं. कॉर्टिसोल हे स्ट्रेस हॉर्मोन म्हणून ओळखलं जातं. हे हॉर्मोन अ‍ॅड्रिनल ग्रंथीतून (Adrenal gland) स्रवतं. जेव्हा हे हॉर्मोन रक्तात मिसळण्यास सुरुवात होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम मेंदूवर (Brain) होतो आणि तणाव वाढू लागतो. ही बाब लॉंग कोविडशी जोडली गेली. कारण अशा बहुतेक प्रकरणांमध्ये झोप न लागणं, डोकं जड होणं आणि थकल्यासारखं वाटणं ही मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणं दिसून आली. `डेली मेल`च्या वृत्तानुसार, आतापर्यंत रुग्णाला लॉंग कोविडचा त्रास होईल की नाही हे सांगणं कठीण होतं, परंतु, आता या संशोधनाचे निष्कर्ष हे शोधून काढण्यासाठी सहायक ठरतील.

Web Title: scientists found symptoms of long covid in corona patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.