‘त्या’ कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध; जेएन १ बाधित रुग्ण दोडामार्गमधील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:39 AM2023-12-22T05:39:28+5:302023-12-22T05:39:42+5:30
गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रुग्णाचा कोरोना अहवाल जेएन १ व्हेरिएंट बाधित आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना जेएन १ बाधित असल्याने त्या रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा सर्व्हे आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे. तसेच त्या गावातील संशयित रुग्णांची रॅपिड किटद्वारे तपासणी केली जाणार आहे.
या आजाराची ताप, सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये सर्दी ताप असल्यास नजीकच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.
गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रुग्णाचा कोरोना अहवाल जेएन १ व्हेरिएंट बाधित आला आहे. हा रुग्ण जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता. हा रुग्ण २३ नोव्हेंबर रोजी कोरोना जेएन १ बाधित आला होता. आता तो पूर्णतः बरा झाला आहे. मात्र खबरदारी म्हणून संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु आहे.
लक्षणे सौम्य पण ताप अंगावर काढू नका
कोरोना जेएन १ व्हेरिएंटची लक्षणे ही सौम्य आहेत. यात ताप, सर्दी आणि खोकला असतो. मात्र ही लक्षणे सौम्य असली तरी नागरिकांनी ती अंगावर न काढता उपचार करुन घ्यावेत.
नागरिकांनी घाबरु नये; काळजी घ्यावी
हा काेरोना व्हेरिएंट सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. केवळ पूर्वीप्रमाणे सतर्कता बाळगावी, हात स्वच्छ धुवावेत, सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन देखील आरोग्य यंत्रणेमार्फत केले आहे.
- डॉ. सई धुरी