सेल्फ केअर... स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकवणारं कार्यक्षम, उपयुक्त मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:38 PM2022-06-08T17:38:34+5:302022-06-08T17:39:16+5:30

कोविड १९ च्या जागतिक महामारीने जगभरात हाहाकार माजवत अनेक कुटुंब आणि संस्थांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. मात्र, यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

Self care an efficient and useful model that teaches self care | सेल्फ केअर... स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकवणारं कार्यक्षम, उपयुक्त मॉडेल

सेल्फ केअर... स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकवणारं कार्यक्षम, उपयुक्त मॉडेल

googlenewsNext

>> संदीप वर्मा

कोविड १९ च्या जागतिक महामारीने जगभरात हाहाकार माजवत अनेक कुटुंब आणि संस्थांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. मात्र, यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आजवर आपण ज्या मुद्दयांकडे दुर्लक्ष करत आलो ते आता समोर आणण्याची वेळ आली आहे. कोणताही समाज यापुढे एका मुद्द्याकडे मुळीच दुर्लक्ष करू शकणार नाही आणि तो म्हणजे आपत्कालीन व्यवस्थेची मागणी तसेच उपलब्ध स्रोतांसह नियमित आरोग्यसेवा पुरवणे. जगभरात या काळात आरोग्यसेवा कोलमडून पडली. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये यात फारसा फरक नव्हता.

कोविडच्या सुरुवातीच्या टप्प्यात ज्या पद्धतीने आरोग्यसेवा पुरवल्या गेल्या त्यातून शिकण्यासारखा एक महत्त्वाचा धडा म्हणजे सध्या आरोग्यसेवेत राबवल्या जाणाऱ्या प्रतिसादात्मक सेवा देण्याच्या मॉडेलमध्ये बदल करणे. कोविडपासून संरक्षण मिळवण्यासाठी लोकांनी सर्वत्रच प्रचंड काळजी घेतली. यात ग्राहकांच्या वर्तनात संरक्षणात्मक आरोग्याकडे झुकणारा कल हा मोठा बदल घडून आला. या बदलात एक मोठी संधी दडली आहे. ग्राहकांमधील आरोग्य साक्षरता वृद्धिंगत करणे, लहानसहान आजारांसंदर्भात बचाव आणि स्वव्यवस्थापन तसेच गंभीर आजारांचे निदान झाल्यास काय करावे याबाबतीत त्यांना सक्षम करणे यावर आधारित आरोग्यसेवा देण्याचे मॉडेल विकसित करता येईल.

सेल्फ केअर म्हणजेच स्वत:ची काळजी घेण्याची संकल्पनाच मुळात भारतासाठी नवी आहे. दैनंदिन आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्याचे लक्ष्य ठेवून केलेल्या बदलांमधून ते अधिक नीट स्पष्ट होईल. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याख्येनुसार, “आरोग्याला चालना, आजारांना प्रतिबंध, उत्तम आरोग्य राखणे आणि आरोग्यसेवा देणाऱ्यांच्या सहकार्याने किंवा त्याविना आजार आणि अपंगत्वाचा सामना करण्याची व्यक्ती, कुटुंब आणि समुदायाची क्षमता” म्हणजे सेल्फ केअर.

अर्थात, सेल्फ केअर हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. ग्राहकांना स्वत:ची काळजी घेता यावी यासाठी त्यांना योग्य ज्ञान आणि प्राथमिक साधनांनी (उदा. तुमच्या स्मार्टवॉचवरील डिजिटल सेल्फकेअर टुल्स) सज्ज करून आधीच बराच ताण असलेल्या आरोग्यसेवा प्रणालीवरील त्यांचे अवलंबित्व कमी करणे हा सेल्फ केअरचा उद्देश आहे. विविध अभ्यासांतून हे स्पष्ट झाले आहे की जुनाट आजारांच्या बाबतीत रुग्णाची काळजी घेण्याचा ९० टक्के भाग हा खुद्द त्या रुग्णावरच अवलंबून असतो. सेल्फ केअरमुळे आरोग्यविषयक सुविधा आणि स्रोतांचे अधिक चांगले व्यवस्थापन शक्य होते. कारण, या सुविधा आणि स्रोत दीर्घकालीन आजार, आपत्कालीन काळजी आणि मृत्यूचा धोका असलेल्या ठिकाणी वापरता येतात.

एक उदाहरण पाहूया. डोकेदुखी हा आपल्या सर्वांनाच भेडसावणारा एक सामान्य आजार आहे. ‘सॅरिडॉन हेडेक रिपोर्ट २०२१’ मधील जागतिक महामारीच्या परिणामांचा वेध घेणाऱ्या या निष्कर्षांमध्ये असे आढळून आले की ९० टक्के शहरी भारतीयांना ताणतणावामुळे डोकेदुखी जाणवते. डोकेदुखी हा काही आजार नाही पण ते एक लक्षण आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये आपणच त्यावर उपाय करू शकतो. मात्र, डोकेदुखीवरील औषधांच्या बाबतीत असलेल्या गैरसमजांमुळे बहुतांश भारतीय औषध घेऊन डोकेदुखी बरी करण्याऐवजी ते दुखणं सहन करत राहतात. कामाच्या ठिकाणी दुखणं सहन करत राहणं किंवा ते लपवण्याऐवजी लक्षणांवर उपाय करण्याची प्रेरणा लोकांना मिळावी यासाठी आरोग्य साक्षरतेचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना योग्य ज्ञानासह स्वत:ची योग्य काळजी घेता येईल.

ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स ऑफ इंडिया (ओपीपीआय) ने २०२१ मध्ये केलेल्या ‘व्हॅल्यू ऑफ ओटीसी ड्रग्स इन इंडिया’ सर्वेक्षणानुसार, एखादी व्यक्ती वर्षातून सरासरी चार वेळा आजारी पडते, भारतातील फक्त ५ लाखाहून अधिक शहरांमधील[] (१२३ दशलक्ष ग्राहक) हा आजारावरील एकूण खर्च वर्षाला ३५,८२० कोटी रुपये इतका आहे. भारतात आजही आरोग्यविमा घेण्याचे प्रमाण एक आकडी आहे. याचाच अर्थ हा सगळा खर्च थेट खिशातून केला जातो. ज्यामुळे आपल्या लोकसंख्येवर अर्थातच प्रचंड भार येतो. शिवाय, सर्वसाधारण आजारांसाठी हेल्थकेअर प्रॅक्टिशनर्सवर अवलंबून राहिल्याने आपल्या आरोग्यसेवा प्रणालीवरही अतिरिक्त भार येतो.

लहानसहान आजारांना स्वत:च औषध घेऊन बरे करणे आणि स्वत:च्या आरोग्याची प्रतिबंधात्मक काळजी घेणे यासाठी जबाबबदारीने आणि संपूर्ण माहिती घेऊन उपचार केल्याने ओटीसीचा वापर करणारे वातावरण तयार होईल. ओटीसी उत्पादनांची जाहिरात आणि विक्री यासंदर्भात दमदार आणि पारदर्शक नियमावली असल्यास आणखी फायदा होईल. यामुळे आरोग्यसेवेवर खिशातून करावा लागणारा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

प्रतिबंधात्मक उपाय करणे आणि छोट्या आजारांवर उपचार करण्यासाठी सक्रिय आणि माहितीच्या आधारावर निर्णय घेण्यासाठी ग्राहकांना सक्षम करण्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमनातील सुयोग्य बदलांसोबतच योग्य ज्ञान आणि साधने पुरवणे. जगभरात ग्राहक आरोग्य क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी म्हणून सेल्फ केअरबद्दल जागरुकता आणणे, दैनंदिन आरोग्य काळजीची उत्पादने सहज उपलब्ध करून देणे आणि सुरक्षित, जबाबदार सेल्फ मेडिकेशन उपाय पुरवून ग्राहकांच्या दैनंदिन आरोग्यात सकारात्मक बदल आणणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

जबाबदार पद्धतीने राबवल्यास सेल्फ केअरमुळे वैयक्तिक स्तरावर आरोग्याचे सकारात्मक परिणाम दिसतील आणि आरोग्यसेवा प्रणालीत लक्षणीय कार्यक्षमता निर्माण होईल. सेल्फ केअरचा मुद्दा जागतिक स्तरावर धोरणात्मक प्राधान्यक्रम म्हणून राबवल्यास आपण २०३० या लक्ष्यित वेळेपर्यंत संयुक्त राष्ट्रांचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (एसडीजी) हे जागतिक आरोग्यसेवेचे लक्ष्य गाठू शकू. सेल्फ केअरचा मुद्दा जागतिक आरोग्य धोरणांमध्ये प्राधान्यक्रमावर आणण्यासाठी ही सुयोग्य वेळ आहे. यात विशिष्ट देश आणि प्रदेशांसाठी शाश्वत, सर्वसमावेशक आणि वैशिष्ट्यपूर्ण उपाययोजना आखता येतील.

(लेखक बायर कन्झ्युमर हेल्थ डिव्हिजनचे कंट्री हेड, इंडिया आहेत)

Web Title: Self care an efficient and useful model that teaches self care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.