कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी भाग पाडतो सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:16 AM2019-01-23T10:16:18+5:302019-01-23T10:24:09+5:30
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका दिवसात ३ पेक्षा जास्त सेल्फी घेऊन सोशल मीडियात पोस्ट करणं सेल्फायटिस आजाराच्या अंतर्गत येतं.
(Image Credit : www.adweek.com)
सेल्फी घेणे आणि सोशल मीडियात पोस्ट करणे ही आजकाल फॅशन झाली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका दिवसात ३ पेक्षा जास्त सेल्फी घेऊन सोशल मीडियात पोस्ट करणं सेल्फायटिस आजाराच्या अंतर्गत येतं. सेल्फी घेण्याच्या नादात अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरी सुद्धा सेल्फीची क्रेझ काही कमी झाल्याचे बघायला मिळत नाही. मात्र एका नव्या रिसर्चचे निष्कर्ष तुम्हाला सेल्फी काढण्याआधी दहा वेळा विचार करायला लावतील.
सेल्फीचा मनोवैज्ञानिक प्रभाव
या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, आपला सेल्फी पाहिल्यानंतर अनेक लोक कॉस्मेटिक सर्जरी करण्याबाबत विचार करू लागतात. सेल्फीचा मनावर इतका प्रभाव पडतो की, सेल्फी घेणारा व्यक्ती जास्त चिंतेत राहतो, त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि त्यांना शारीरिक आकर्षणात कमतरता जाणवू लागते. सेल्फी घेणाऱ्या अनेक लोकांमध्ये त्यांच्या रंगरुपाबाबत हीन भावना इतकी वाढते की, रंगरुप बदलण्यासाठी ते कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा विचार करू लागतात.
३०० लोकांवर अभ्यास
(Image Credit : www.freepik.com)
एस्थेटिक क्लीनिक्सकडून करण्यात आलेल्या एका अभ्यासात ३०० लोकांचा समावेश करण्यात आला होता. हे लोक कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद येथील एस्थेटिक क्लीनिकमध्ये गेले होते. या अभ्यासात असं आढळलं की, कोणत्याही फिल्टरचा वापर करताच सेल्फी पोस्ट करणाऱ्यांमध्ये चिंता वाढू लागते आणि त्यांचा आत्मविश्वास कमजोर होतो. जे लोक सेल्फी एटीड करुन किंवा न करताच पोस्ट करतात त्यांच्या शारीरिक आकर्षणाबाबत हीन भावना येते. जे लोक सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्यापूर्वी पुन्हा सेल्फी घेतात, त्यांचा मूड सतत खराब होतो.
कॉस्मेटिक सर्जरी करण्याबाबत विचार करतात
या अभ्यासात हा मुद्दा महत्वाचा आहे की, सेल्फी पोस्ट करणारे जास्तीत जास्त लोक आपला लूक बदलण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीसारख्या प्रक्रियेतून जातात. सरासरी १६ ते २५ वर्षा दरम्यानचे पुरुष आणि महिला दर आठवड्याला ५ तासांपर्यंत सेल्फी घेतात. आणि त्यांच्या सोशल मीडियात अकाऊंटवर शेअर करतात. या अभ्यासाचे निष्कर्ष मानसिक आरोग्य समस्यांना रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. पण हे निष्कर्ष सोशल मीडियात आणि आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण चिंता निर्माण करतात.
सेल्फीमुळे ६० टक्के लोकांच्या एंग्जायटी(चिंता)मध्ये वाढ
या अभ्यासात पहिल्यांदाच आढळलं की, सेल्फीचा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरही प्रतिकूल मानसिक प्रभाव पडतो. ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो त्यांच्यावर याचा जास्त प्रभाव बघायला मिळतो. तसेच त्या लोकांवरही या प्रभाव बघायला मिळतो जे लोक त्यांचा कमीपणा आणि सामाजिक एंग्जायटी कमी करण्यासाठी सार्वजनिक रुपाने लोकांशी जुळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियात प्लॅटफॉर्मवर आपला सेल्फी पोस्ट केल्यावर लोकांचा व्यवहार बघण्यासाठी देशात करण्यात आलेल्या एका अभ्यासाता ६० टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिलांच्या एंग्जायटीमध्ये वाढ झाली आहे.