देशात लठ्ठपणाची गंभीर समस्या, जंक फूडमुळे ५४ प्रकारचे आजार; निरोगी जीवनशैलीची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 05:55 AM2024-07-23T05:55:09+5:302024-07-23T05:55:27+5:30
लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांमधील लठ्ठपणा हा सुद्धा चिंतेचा विषय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिली : बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात वेगाने वाढत असलेल्या लठ्ठपणामुळे आर्थिक पाहणी अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आरोग्यासाठी पोषक नसलेला आहार तसेच जंकफूडमध्ये ५४ प्रकारचे आजार वाढले आहेत. लठ्ठपणाच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी निरोगी जीवनशैली अंगिकारण्यावर भर दिला पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे.
लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांमधील लठ्ठपणा हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. जर भारताला लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा योग्य रितीने फायदा उठवायचा असेल तर आरोग्याच्या निकषांवर देशातील नागरिकांची स्थिती चांगली असायला हवी, त्यांनी योग्य प्रकारच्या आहाराला प्राधान्य दिले पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अहवालाचा दाखला आर्थिक पाहणी अहवालात दिला आहे. यात म्हटले आहे की, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन आणि शारिरीक हालचालींमध्ये झालेली घट यामुळे देशांत वजन वाढण्याची तसेच लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. भारतात वयोवृद्धांमधील लठ्ठपणा वाढीचा वेग तीन टक्केपेक्षा अधिक आहे.
गावांच्या तुलनेत शहरांमध्ये वेगाने वाढ
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसार (एनएफएचएस) भारतात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा वेग अधिक आहे. शहरांमध्ये हा वेग २९.८ टक्के तर ग्रामीण भागामध्ये १९.३ टक्के इतका आहे. १८ ते ६९ या वयोगटातील पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण २२.९ टक्के इतके आहे. वर्षभरापूर्वी हे प्रमाण १८.९ टक्के इतके होते. महिलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण यात काळात २०.६ टक्क्यांवरून वाढून २४ टक्के इतके झाले आहे.