गंभीर स्वरूपाचा कोविड ओळखता येणार! पालिकेसह ICMR चा अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:47 AM2023-01-21T11:47:24+5:302023-01-21T11:47:47+5:30
उपचार पद्धतीतील बारकावे जाणून घेणे सोपे होईल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना महासाथीनंतर अजूनही वैश्विक पातळीवर या आजाराविषयी संशोधन सुरू आहे. परिणामी, या माध्यमातून विषाणू व संसर्गाविषयी तीव्रता, उपचारपद्धतींविषयी अधिक सखोलपणे तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. पालिका इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह अँड चाईल्ड हेल्थ या दोन संस्थांच्या मदतीने करत असलेल्या अभ्यासातून लवकरच गंभीर स्वरूपाचा कोविड ओळखणे सोपे होणार आहे.
दोन्ही संस्थाकडून होणाऱ्या या संशोधन अभ्यासातील अपेक्षित निष्कर्षाला बायोमार्कर ही संज्ञा आहे. २०२० पासून कोविडच्या उपचारपद्धतीविषयी संशोधन सुरू आहे. याविषयी, व्हायरल इम्युनोपॅथोजेनेसिस लॅब विभागाचे प्रमुख वैनव पटेल यांनी सांगितले, अनेकदा कोरोना संसर्गाची तीव्रता समजणे कठीण होते. काही रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाही, मात्र आजार गंभीर स्वरूपाचा असतो. तर काहींना कोरोनासह अन्य विषाणूचीही बाधा झालेली असते. त्यामुळे या अभ्यासातून कोरोनाची तीव्रता आणि नेमके आजाराचे स्वरूप समजण्यास मदत होणार आहे. लवकरच अभ्यासाच्या पहिल्याचे टप्प्याचे निरीक्षण प्रकाशित होईल, हा अभ्यास ल्युकोसाइट बायोलॉजीच्या प्रीव्हिह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाला.
- या अभ्यासाच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या उपचार पद्धतीतील बारकावे जाणून घेणे सोपे होईल. तसेच, उपचारपद्धतीत करावयाचे बदलही समजून येतील.
- त्यामुळे लवकरच कोविड रुग्णांच्या नमुन्यांवर व्यापक पद्धतीने हा अभ्यास करून पूर्ण होईल.
- या अभ्यासाचे सादरीकरण पालिकेच्या आरोग्य विभागातील तज्ज्ञांसाठीही करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.