आजार नसूनही आजारी असल्याच्या भावनेत जगतात ८० टक्के रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 09:51 PM2018-04-06T21:51:07+5:302018-04-06T21:51:07+5:30
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात तणावामुळे आजार वाढत आहेत असे म्हटले जाते जाते. मात्र तणावामुळे रक्तदाब किंवा मधुमेह एवढेच नाही तर मनोशारीरिक (सायकोसोमॅटीक) आजारांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज असलेल्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ही खास माहिती.
पुणे : प्रसंग एक : प्रसाद (नाव बदललेले)वय २७, मागील दोन तास डॉक्टरांना मेंदूत बिघाड झाल्याचे पटवत होता. डॉक्टर मात्र एमआरआयचे तपासणीत तसे काहीही निष्पन्न न झाल्याने त्याला गोळ्या देण्यात तयार नव्हते. अखेर प्रसादने दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
प्रसंग दोन : वीणाताई (नाव बदललेले) वय ५५ ह्रदयविकाराचा झटका आल्याचा दावा करत एका आठवड्यात तिसऱ्यांदा डॉक्टरांकडे आल्या होत्या. त्यांनाही डॉक्टरांनी तपासणीअंती काहीही झाले नसल्याचे सांगितले. मात्र तरीही त्या मानायला तयार नव्हत्या.
वरील दोनही केसेसमध्ये शारीरिक आजार नसताना केवळ तणावामुळे शारीरिक आजार आहेतच असा गैरसमज व्यक्ती करून घेते. मनोशारीरिक या नावाने हा आजार ओळखला जातो. जगभरात तब्बल ८० टक्के लोक या विकाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे तणावाचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः मनोशारीरिक विकार असलेल्या रुग्णाला शारीरिक व्याधी नसताना आजारी असल्याची भावना होते, अगदी काहीवेळा वेदनाही होतात. तपासणीअंती काहीही झालं नाहिये असे डॉक्टरांनी पटवले तरी रुग्ण ऐकायला तयार नसतात.
ही आहेत लक्षणे ?
तणाव हे एकमेव कारण नसले तरी सर्वांचे महत्वाचे कर आहे. कमी वयात वाढत्या अपेक्षांची परिणती तणावात होते आणि त्यातून आजार रुग्णाला जडल्याची भावना निर्माण होते. त्यातही पोटात गाठ आहे, छातीत सतत वेदना होत आहेत, सतत डोके दुखते,हात पाय थरथरणे अशी लक्षणे रुग्णाला जाणवायला लागतात. काही अपवादात्मकवेळा ती खरी असतातही पण अनेकदा त्या भासातून पुढील तपासण्या केल्या तर काहीही निष्पन्न होत नाही. याचा अर्थ रुग्णाला शारीरिक नव्हे तर मानसिक आजार असतो. याच प्रकारचे रुग्ण रोज अपचन होते, अंग दुखते म्हणून गोळीची सवय करतात आणि एका पातळीला त्रास होवो अगर न होवो त्यांना गोळ्या घेतल्याशिवाय चैन पडत नाही.
प्रतिक्रिया
हल्ली प्रमाण वाढत आहे मनोशारीरिक आजारांचे. त्यासाठी तणाव हे मुख्य कारण आहे. सर्व वयोगटात असे रुग्ण असून त्यांना आपल्याला काहीही आजार नाही हे स्वीकारणे कठीण जाते. मात्र समुपदेशन आणि तणाव कमी झाल्यावर ते अखेर यातून बाहेर पडतात.
- डॉ दीपा निलेगावकर, समुपदेशक