रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे की पिऊ नये?; तज्ज्ञांनी केलं सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 06:38 AM2022-02-17T06:38:41+5:302022-02-17T06:38:57+5:30
काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि चीन येथील तब्बल वीस हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं.
तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप येते? मध्ये वारंवार जाग न येता शांतपणे तुम्ही झोपू शकता? - बहुतेकांचं याबाबतीतलं उत्तर असेल, ‘नाही’. कारण अनेकांना रात्री शांतपणे झोपच लागत नाही. मग, संपूर्ण दिवस आळसावलेला जातो. उत्साही, प्रसन्न वाटत नाही. पण, ‘पाणी’ हे त्याचं कारण असू शकतं हे तुम्हाला माहीत आहे?
पाणी आणि झोप या दोन्ही गोष्टींचा अतिशय जवळचा संबंध आहे. दिवसभरात, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही खूप पाणी पित असाल किंवा दिवसभरातलं तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी असेल, तरीही तुमच्या झोपेचे तीनतेरा वाजू शकतात. पाणी पिण्याचं प्रमाण कमी असेल, तर रात्री तहान लागल्यानं पाणी पिण्यासाठी तुम्हाला उठावं लागेल. त्यामुळे तुमची झोप चाळवेल आणि पुन्हा लगेच झोप येण्यासाठीही अडथळे येतील. त्याचप्रमाणे तुम्ही जास्त पाणी पीत असाल, तर रात्री लघवीसाठी म्हणूनही तुम्हाला वारंवार झोपेतून उठावं लागेल.
याउलट तुम्हाला झाेपेची समस्या असेल, तर त्यामुळेही तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि चीन येथील तब्बल वीस हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या अभ्यासात आढळून आलं, की जे लोक रोज सहा तासांपेक्षा कमी झोपत होते, त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण, जे लोक रोज आठ तास झोपत होते, त्यांच्यापेक्षा कमी होतं. आपल्या शरीरातील पाण्याचा जास्तीतजास्त निचरा मुख्यत्वे लघवीवाटे होतो, याशिवाय श्वसनावाटे आणि आपली त्वचा जे द्रवपदार्थ बाहेर फेकते, त्यामुळेही आपल्या शरीरातील पाण्याची मोठी घट होते. नुसत्या श्वसनावाटेच दिवसभरात सुमारे तीनशे ते चारशे मिलीलीटर द्रवपदार्थ बाहेर फेकला जातो.
रात्री शांत झोप यावी यासाठी दिवसा वेळच्या वेळी पाणी पिणं, त्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवणं, कॅफिन, मद्य कमी किंवा बंद करणं, आहारात फळं आणि पालेभाज्या यांचा समावेश करणं असे उपाय नक्की करून पाहा. याशिवाय झोपण्यापूर्वी एक ते दोन तास आधी पाण्याचं प्रमाण मर्यादित करा, तहान लागलीच तर घोटभरच पाणी प्या, झोपताना आपले पाय थोडे उंच असतील असं पाहा. ज्यामुळे तुमच्या पायातील पाणी शरीराकडून शोषलं जाणार नाही. चांगल्या झोपेसाठी शरीरातील पाण्याचं प्रमाणं योग्यच असलं पाहिजे.