क्रिमी मेयोनीज गरोदरपणात खावसं वाटतं, पण ते सुरक्षित आहे का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 04:50 PM2022-08-31T16:50:54+5:302022-08-31T16:52:47+5:30

अनेक पदार्थांमध्ये वापरलं जाणारं मेयोनीज. याची चव अनेकांना आवडते. तसेच हे खूप क्रिमी असल्यामुळे गरोदरपणातही स्त्रिया हट्टानं ते खातात; मात्र  गरोदरपणात हे खाणं सुरक्षित आहे का?

should eat mayonnaise in pregnancy know the truth | क्रिमी मेयोनीज गरोदरपणात खावसं वाटतं, पण ते सुरक्षित आहे का? जाणून घ्या सत्य

क्रिमी मेयोनीज गरोदरपणात खावसं वाटतं, पण ते सुरक्षित आहे का? जाणून घ्या सत्य

Next

गरोदरपणात स्त्रियांना स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. खरं तर या काळात काही विशेष गोष्टी खाण्याचे डोहाळे स्त्रियांना लागतात. या काळात स्त्रियांनी आवडीचे पदार्थ खावेत, असं जुने-जाणते लोक सांगतात; मात्र अलीकडे पदार्थांमध्ये खूप वैविध्य आलं आहे. ते करण्याच्या प्रक्रियाही विविध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अनेक पदार्थांमध्ये वापरलं जाणारं मेयोनीज. याची चव अनेकांना आवडते. तसेच हे खूप क्रिमी असल्यामुळे गरोदरपणातही स्त्रिया हट्टानं ते खातात; मात्र  गरोदरपणात हे खाणं सुरक्षित आहे का? (Is It Good To Eat Mayonnaise In Pregnancy) असा प्रश्न अनेकींना पडतो. त्या संदर्भात आहारशास्त्र काय सांगतं, याबाबत माहिती घेऊ या. 'नवभारत टाइम्स'ने याबद्दल सविस्तर वृत्त दिलं आहे.

मेयोनीज कसं तयार केलं जातं?
मेयोनीज दोन प्रकारे तयार केलं जातं. एका प्रकारात मेयोनीज तयार करण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग वापरला जातो, तर दुसऱ्या पद्धतीत ऑलिव्ह तेलापासून ते तयार केलं जातं. अंड्याच्या पांढऱ्या भागापासून जे मेयोनीज तयार होतं, त्यात काही वेळा कच्चं अंडं वापरलं जातं. कच्च्या अंड्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. म्हणूनच ncbiच्या मते घरी बनवलेलं मेयोनीज खाऊ नये. कारण त्यासाठी कच्चं अंडं वापरलेलं असतं; मात्र बाहेरचं चांगल्या दर्जाचं मेयोनीज खाण्यास काही हरकत नाही. हे मेयोनीज बनवण्यासाठी अंड्याचं पाश्चरायझेशन केलं जातं.

मेयोनीजचे फायदे
आहारात थोड्या प्रमाणात मेयोनीज असेल, तर ते फायदेशीर असू शकतं. एक चमचा मेयोनीजमध्ये 22.5 मायक्रोग्रॅम के जीवनसत्त्व असतं. गरोदरपणात के जीवनसत्त्वामुळे रक्त गोठायला मदत होते. यामुळे प्रसूतीवेळी अधिक रक्तस्राव होत नाही. एक चमचा मेयोनीजमध्ये (14 ग्रॅम) 94 कॅलरी, 5.8 mg कोलेस्टेरॉल, 80 mg ते 125mg सोडियम असतं. या पोषणतत्त्वांचा अंदाज घेऊनच ते आहारात समाविष्ट करावं.

मेयोनीजचे दुष्परिणाम
मेयोनीजचे फारसे दुष्परिणाम होत नाहीत; मात्र त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. कच्च्या अंड्यापासून तयार केलेल्या मेयोनीजमुळे लिस्टिरीया बॅक्टेरियाचा धोका असतो.ज्यामुळे लिस्टिरियोसिस हा आजार होऊ शकतो. मेयोनीजमध्ये साखर आणि सोडियम असल्यानं डायबेटिस व उच्च रक्तदाब निर्माण होण्याची भीती असते.

काही स्त्रियांना याची अ‍ॅलर्जीही असू शकते. त्यामुळे मेयोनीज विकत घेताना त्यावरचं लेबल नीट वाचून घ्यावं. त्यात कच्चं अंडं वापरलं नाही याची खात्री करावी. तसंच मेयोनीजचा वापर थोडा करावा. मेयोनीज डब्यातून काढताना स्वच्छ चमचा वापरावा. त्यामुळे बॅक्टेरिया संसर्ग होणार नाही.

मेयोनीज खाणं फारसं धोकादायक नसलं, तरी गरोदर स्त्रियांनी त्याकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. सगळ्या गोष्टींची खात्री करून मगच त्याचं सेवन करावं.

Web Title: should eat mayonnaise in pregnancy know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.