कोरोनाला पळवण्यासाठी जास्त काढा प्यायलात आता त्याची फळंही भोगा; 'हे' गंभीर आजार वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 04:04 PM2021-09-20T16:04:01+5:302021-09-20T16:29:21+5:30
कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणे देखील हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे.
कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणे देखील हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मूत्रपिंडाच्या रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्येही लघवीशी संबंधित रुग्ण येऊ लागले आहेत. दिल्ली सरकारचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या एलएनजेपीचीही अशीच स्थिती आहे. अनेक राज्यांच्या प्रमुख रुग्णालयांमध्येही मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या असलेले रुग्ण येत आहेत.
कोरोनाचा (Coronavirus) कहर आणि भीती लक्षात घेता लोकांनी काढा पिण्याचे प्रमाण प्रचंड वाढवले आहे. अलिकडे जवळजवळ प्रत्येक घरात काढा प्यायला जातो. आयुर्वेदात काढा पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. परंतु काढा जास्त प्रमाणात पिणं शरीरासाठी हानिकारक ठरत आहे. हे लक्षात घेऊन डॉक्टरांनी कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डॉक्टरांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अनावश्यक औषधांचा वापर वाढवल्यानं शरीर दुखणे आणि अस्वस्थतेच्या तक्रारी करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बहुतेक रुग्णांमध्ये सीरम क्रिएटिनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मूत्रपिंड खराब होण्यासारखी गंभीर बाब दिसून येत आहे.
किडनीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. राजेश कुमार यांनी न्युज १८ हिंदीला दिलेल्या माहितीत म्हणतात की, काढा हा गरम असतो आणि तो जास्त प्रमाणात प्यायल्याने तोंड आणि पोटात अल्सर होऊ शकतो. दालचिनी, गिलोय, काळी मिरी सारख्या गोष्टींच्या प्रमाणामुळे पोटदुखी, छातीत जळजळ किंवा अॅसिडिटी सारख्या समस्या सुरू होतात. जर त्याचे उपचार वेळेवर सुरू झाले नाहीत तर मूत्रपिंड (किडनी) खराब होण्याची शक्यता वाढते. जास्त प्रमाणात काढा घेणे यकृतासाठी देखील हानिकारक आहे.