कानाला इअर फोन लावून मोठ्याने गाणी ऐकता? वेळीच व्हा सावध नाही तर.....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 01:31 PM2024-06-29T13:31:50+5:302024-06-29T13:33:40+5:30

आजकाल ब्लूटूथ आणि वायरलेस डिवाइसचा ट्रेंड चालला आहे.

side effects of wearing headphones for long hours increased bacteria and hearing loss | कानाला इअर फोन लावून मोठ्याने गाणी ऐकता? वेळीच व्हा सावध नाही तर.....

कानाला इअर फोन लावून मोठ्याने गाणी ऐकता? वेळीच व्हा सावध नाही तर.....

Wearing Head Phones Side Effects : आजकाल ब्लूटूथ आणि वायरलेस डिवाइसचा ट्रेंड चालला आहे. मोबाईलसह त्यासंबंधित उपकरणांचा अतिवापर केल्यामुळे नवनवे आजार वर तोंड काढत आहेत. आजकाल काहींना स्मार्टफोन आणि हेडफोनशिवाय जमत नाही. काही लोकं काम करत असताना, किंवा प्रवास करताना इअरफोन्स लावून आवडीची गाणी ऐकतात. सतत इअर फोनचा वापर, कानात पाणी जाणे, कर्णकर्कश आवाज असणाऱ्या परिसरातील  वावर तसेच कानाच्या आतील भागास संसर्ग होणे आणि वयोमानानुसार कानाच्या नसा कमजोर होणे, अशा विविध कारणांमुळे कानाचे आजार गेल्या काही वर्षांत वाढले असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. यावर वेळीच उपचार घेतल्यास अनेक आजार बरे होतात. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांचा वेळेतच सल्ला घेणे आवश्यक आहे.

काही दिवसांपूर्वीच गायिका अलका याज्ञिक यांची श्रवणशक्ती कमी झाल्याचे त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर  कानाच्या आजारांबाबत चर्चा वाढली आहे. याज्ञिक यांना ‘रेअर सेंसरिनुरल नर्व्ह हिअरिंग लॉस’ हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारात कानापासून मेंदूपर्यंत जाणारी नस कमजोर होऊन त्याला गंभीर इजा होते. त्यामुळे कमी ऐकू येते. काही वेळेस व्हायरल इन्फेक्शनमुळेही हा आजार होऊ शकतो. 

बहिरेपणावर उपचार आहेत. मात्र, त्यासाठी रुग्णांनी योग्य वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. लहानपणापासून बहिरे असणाऱ्यांवर कॉक्लिअर इम्प्लांटच्या सहाय्याने आता चांगले उपचार करता येतात. वयस्क व्यक्तींना श्रवणयंत्रे आहेत. तरुणांनी ८० डेसिबलपेक्षा कमी आवाजात ऐकावे.  इअर फोनचा वापर करताना दर अर्ध्या तासाने तो काढावा. बहिरेपणा किती प्रमाणात आला, याची चाचणी शासकीय रुग्णालयात करता येते. त्यामुळे त्यानुसार उपचार करणे शक्य आहे. काही दुर्मीळ आजारांत शस्त्रक्रिया करूनही उपचार करता येतात. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

लक्षणे काय? 

१) कान दुखणे, जळजळ होणे. 

२) कानातून चिकट द्रव्य पदार्थ बाहेर येणे.

३) कानाला सूज येऊन कमी ऐकू येणे. 

४) कानातील मळामुळे संसर्ग होणे. 

काळजी काय घ्याल? 

१) कानाचा आजार असल्यास अंगावर काढू नका, किंवा घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

२) ॲन्टीबायोटिकचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावा. 

३) कानात पाणी जाणार नाही, याची काळजी घ्या.

४) थंड पदार्थ जास्त घेऊ नये. 

कानाच्या नसा कमजोर-

वाढत्या वयानुसार कानाच्या नसा कमजोर होणे, मानेला किंवा कानाला गंभीर दुखापत झाल्यामुळे नसांचे नुकसान होणे, कानाच्या आतील भागातील पेशींना इजा होणे, त्यासोबत मधुमेह आणि  रक्तदाबाचे आजार असणाऱ्यांनाही हा आजार होतो. 

लहान मुलांना सांभाळा; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला-

लहान मुलांमध्येही कानाचे विविध आजार बळावतात. टॉन्सिल आणि मोठ्या प्रमाणात सर्दी असलेल्या मुलांना कानाचे आजार होतात. त्यामुळे अधिक प्रमाणात थंड पदार्थ, पेय मुलांना देऊ नये. कान दुखत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासून त्यावर उपचार करावेत. काहीवेळा गरजेनुसार छोटी शस्त्रक्रिया केल्यास आजार बरा होऊ शकतो.

Web Title: side effects of wearing headphones for long hours increased bacteria and hearing loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.