कलिंगड खाणे जितके फायद्याचे तितकेच तोट्याचेही...पाहा कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:09 PM2021-05-06T18:09:25+5:302021-05-06T19:34:12+5:30
उन्हाळ्यातलं सर्वांचं आवडतं फळ म्हणजे कलिंगड. पण कलिंगडाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत...
उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे एक फळ म्हणजे कलिंगड. लाल, रस्दार, थंडगार कलिंगड खायला सर्वांनाच आवडत. कलिंगडाचा ज्यूस, मिल्कशेक असे नानाविविध पर्याय खव्वय्यांसाठी उपलब्ध असतात. कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण ९२टक्के असतं. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडाचा खप सर्वाधिक असतो.
आतापर्यंत तुम्हाला कलिंगडाचे फायदे माहीत असतील. पण कलिंगडाचे तोटेही आहेत बरं. ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण आधी त्याचे फायदे जाणून घ्या.
- कलिंगडामध्ये फॅट आणि कॅलरीज अजिबात नसतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी कलिंगड हे एक वरदान आहे.
- कलिंगडात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. व्हिटॅमिन बी ६ मुळे शरीरात लाल पेशी वाढण्यास मदत होते. तसेच अँटीबॉडीजचीही वाढ होते.
- कलिंगड खाल्ल्याने तुमची पचनशक्ती सुधारते. यात ९२ टक्के पाणी असल्याने अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होतात.
- कलिंगडामुळे तुमची त्वचा चमकदार होते. बाजारातील महागड्या क्रीम्सपेक्षा कलिंगड खाणं हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.
- कलिंगडामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात कलिंगड महत्वाची भूमिका बजावते. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते.
हे झाले कलिंगडाचे फायदे...आता तोटे पाहू.
- मधुमेहाच्या रुग्णांनो कलिंगड खाताना सावधान! जरी नैसर्गिक असली तरी कलिंगडामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील शर्करेचे प्रमाणही वाढू शकते.
- दिवसभरात केवळ ४०० ते ५०० ग्रॅम इतकेच कलिंगड खावे. नाहीतर जुलाब, गॅस अशा समस्यांना सामोरे जावे लागते. पोटाचे इतर विकारही संभवतात.
- रात्रीच्यावेळी तर कलिंगड अजिबात खाऊ नका. त्यामुळे वजन घटण्याऐवजी वाढेल. कारण वर म्हटल्याप्रमाणे कलिंगडात शर्करेचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्यावेळी आपल्या शरीराची पचनक्रिया मंदावते. अशात कलिंगड खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. पर्यायाने वजनात वाढ होते.
- लो बीपी म्हणजेच कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी कलिंगड खाऊ नये. कलिंगडामुळे ही समस्या जास्त वाढू शकते.
- तुम्ही रोज मद्यपान करत असाल तर कलिंगडाचे सेवन करू नका. त्यामुळे पित्ताशयाची समस्या जाणवू शकते.
- शेवटचे पण अत्यंत महत्वाचे. गरोदरपणात महिलांनी कलिंगड खाणे पूर्णत: टाळावे. या काळात कलिंगड खाल्ल्यास गरोदरपणातील मधुमेह होण्याचा धोका असतो.