स्त्रीयांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, या लक्षणांकडे चुकूनही करू नका कानाडोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:03 PM2019-11-25T14:03:21+5:302019-11-25T14:34:47+5:30
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे.
(Image credit- thoughtco.com)
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे. राहणीमानात तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्याने कर्करोगाचा आजार होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नव भारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार देशाच्या कानाकोपऱ्यात कर्करोग हा जीवघेणा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मागील वर्षी आरोग्य मंत्रालयातर्फे एक आलेख सादर करण्यात आला होता. ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण दाखवले गेले होते. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्वसाधारणपणे कॅन्सर रुग्णांमध्ये फुफूसांचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, सर्व्हायकल कर्करोग या कर्करोगांचे प्रमाण सर्वाधिक आहेत.
(Image credit- Drug target review)
त्वचा, स्नायू, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो. हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्त वा रसावाटे पसरू शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग, स्तनांचा कर्करोग या भागाशी संबंधित असतात.जाणून घ्या स्तनांच्या कर्करोगाची लक्षणं आणि कारणं
(Image credit-qimrberghofer.edu)
स्तनाचा कर्करोगातील प्रारंभिक लक्षणे
स्तनात गाठ तयार होणे.
स्तनाच्या त्वचेवर खड्डे पडणे.
स्तनाच्या त्वचेवर रंगात बदल.
स्तनामध्ये दुखणे.
स्तनाच्या टोकाला खाज सुटणे.
स्तनामधून स्त्राव येणे.
स्तनाच्या टोकावर भेगा पडणे व वेदना होणे.
(Image credit-wespeakscience)
स्तनांच्या कर्करोगांची कारणे
आपल्या शरीरातील पेशींची जेंव्हा अनिर्बंध वाढ होऊ लागते तेंव्हा कर्करोगाची लागण होते. त्याच प्रमाणे जेंव्हा स्तनातील पेशींची अनिर्बंध वाढ होते तेंव्हा स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू लागतात. स्तनाच्या पेशीत होणाऱ्या बदलाचा संबध स्त्री संप्रेरक एस्त्रोजन ह्याच्याशी निगडीत असल्याचे वैज्ञानिक रित्या सिद्ध झाले आहे.
(Image credit-biomedcentral.com)
स्त्रियांमध्ये वयोगट ४० वर्षावरील महिला.तसेच ज्यांच्या घराण्यात कर्करोग हा अनुवांशिक आहे. अशा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो. ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर सुरु झाली आहे. ज्या स्त्रिया स्थूल आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणा होऊ नये म्हणून नियमित गोळ्या घेत आहेत, अशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असू शकते. जर मुले वयाच्या तिशीनंतर झाली असतील तर अशा स्त्रियांना धोका असू शकतो.